लाचप्रकरणी होते अटकेत
सातारा –अडीच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुणे व सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केलेले फलटण पोलीस उपविभागीय कार्यालयाचे पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) डॉ. अभिजित शिवाजीराव पाटील (वय 38, मूळ रा. स्वातंत्रसैनिक कॉलनी, राजेंद्रनगर, कोल्हापूर, सध्या रा. फलटण, शासकीय निवासस्थान) यांना न्यायालयाने अखेर तब्बल अठ्ठावीस दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जामिन मंजूर केला आहे. कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर डीवायएसपी पाटील आज (गुरूवारी) बाहेर सुटतील अशी सुत्रांची माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, खंडाळा पोलिस ठाण्यामध्ये फसवणूक केल्याप्रकरणीचा एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास फलटण डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील हे करत होते. फसवणुकीबाबतचे प्रकरण तपासल्यानंतर या प्रकरणात आठ लाख रुपयांचा डीडी मिळवून देतो, असे सांगून 2 लाख 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीच्या सातारा विभागाला प्राप्त झाली होती. त्यानंतर दि. 17 रोजी एसीबीच्या पडताळणीमध्ये अडीच लाख रुपयांपैकी 1 लाख 75 हजार रुपये स्वीकारण्याची तयारीही डीवायएसपी पाटील यांनी दर्शवल्याचे समोर आले होते. त्यानुसार एसीबीच्या पुणे व सातारा टिमने सापळा लावला होता.
दरम्यान पुणे एसीबी सापळ्याच्या तयारीत असतानाच कारवाईत थोडासा गोंधळ उडाल्याने सापळा लागल्याचे डॉ.अभिजीत पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. उलट तक्रारदार यांना कारमध्ये जबरदस्तीने घालून त्यांना ते घेवून गेले होते. तक्रारदाराकडील मोबाईल, शासकीय व्हाईस रेकॉर्डर काढून तो टाकून दिला होता. एवढ्यावरच न थांबता पाटील यांनी तक्रारदार यांना मारहाण करुन त्यांना कारमधून ढकलून दिल्याची माहिती फिर्यादीत होती. घटनेनंतर सुमारे एक तासानंतर डीवायएसपी पाटील एसीबीला सापडले होते. त्यानंतर त्यांचा ताबा घेवून त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी करून त्यांच्याविरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पाटील हे न्यायालयीन कोठडीत होते. अखेर तब्बल अठ्ठावीस दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पाटील यांना पन्नास हजाराचा (सॉलवंसी) जामिन मंजूर झाला आहे.