बेसुमार माती उत्खननामुळे शेतजमीन धोक्‍यात

उंब्रज – तारळी नदीकाठच्या मळवीतील बेसुमार माती उपशामुळे कोर्टीच्या शेतकऱ्यांची शेतजमीन धोक्‍यात आली आहे. जमीन वाचवण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने महसूल विभागाला साकडे घातले आहे. परंतु महसूल विभाग दाद देत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. माती उपशाने साडेतीन एकर शेतजमीन नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नुुुकसान झाल्यास संपूर्ण कुटूंबावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असे निवेदन संबंधित शेतकऱ्याने प्रसिद्धी माध्यमाना दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोर्टी ता. कराड येथील सुभाष सखाराम थोरात यांनी बेसुमार माती उपशामुळे शेतजमीन वाचविण्याबाबत 16 फेब्रुवारी रोजी गाव कामगार तलाठी यांच्याकडे लेखी स्वरूपात अर्ज दिला आहे. कोर्टी येथील हायवेच्या पश्‍चिमेस हिंगनोळे पाणवठा नावच्या शिवारात तारळी नदीकाठी गट नंबर 542 मध्ये सुभाष थोरात यांच्या मालकीची तीन एकर दहा गुंठे शेतजमीन आहे. तर त्यांच्या क्षेत्रालगत 553 हा गट असून त्यामध्ये दिपक थोरात, अजित थोरात, बाळकृष्ण थोरात, अशोक थोरात यांचे सामायिक क्षेत्र आहे. त्यांनी संगनमताने त्यांच्या क्षेत्रातील माती विक्रीसाठी काढण्यास सुरुवात केली आहे. माती काढण्यात सुभाष थोरात यांची कोणतीही हरकत नाही. परंतु सदरच्या लोकांकडून सुमारे पंचवीस ते तीस फुटापर्यंत खोल उत्खनन सुरू आहे. त्यामुळे थोरात यांची 542 गटनंबर मधील शेतजमीन ढासळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

प्रमाणापेक्षा अधिक उत्खनन झाल्याने संपूर्ण क्षेत्र धोक्‍यात आले आहे. तसेच सुभाष थोरात यांच्या मालकीची शंभर नारळाची झाडे, पंधरा आंब्याची झाडे, शंभर सागवानाची झाडे ही फळझाडे व वनसंपदा धोक्‍यात आली आहे. या उत्खननाने ही वनसंपदा ढासळण्याची भीती आहे. त्यामुळे शेतजमिनीचे अतोनात नुकसान होऊन सुभाष थोरात यांच्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होणार आहे. त्यामुळे संबंधित लोकांनी थोरात यांच्या शेतजमिनी पासून पाच फुटापर्यंत माती काढू नये, अशी विनंती सुभाष थोरात यांनी तलाठी तसेच महसूल विभागाकडे केली आहे. अद्याप संबंधितांकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने व सुमारे 25 ते 30 फूट खोल माती काढण्याचे काम सुरू असल्याने महसूलच्या कारभाराबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. उत्खननाच्या संभाव्य धोक्‍यातून शेतजमीन वाचवण्यासाठी सुभाष थोरात या शेतकऱ्यांचे महसूल प्रशासनाकडे हेलपाटे सुरू आहेत. मात्र कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे हा उपसा न थांबल्यास कुंटूबासह आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)