वाळुच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील बांधकामे रखडली

बांधकाम व्यावसायिकांसह घरकुल लाभार्थ्यांपुढे अडचणी
दीपक देशमुख

सातारा – गृहप्रकल्पांसाठी मोठी गुंतवणूक केलेले बांधकाम व्यवसायिक सध्या जिल्ह्यात वाळूचा तुटवडा असल्याने चांगलेच धास्तावले आहेत. हरित लवादाने वाळू उपशावर बंदी आणली आहे. त्यामुळे बांधकाम पूर्ण करण्यासाठी वाळू उपलब्ध करताना बांधकाम व्यवसायिकांची चांगलीच दमछाक होवू लागली आहे. वाळू नसल्याने अनेक बांधकामे रखडू लागली आहेत. बिल्डर लॉबीबरोबरच अन्य छोटी-मोठ्या घरांचे बांधकाम, घरकुल योजनेतून घरांचे स्वप्न साकार करणारे लाभार्थी यांनाही याचा मोठा फटका बसू लागला आहे.

जिल्ह्याची वाळूची रोजची गरज हजारो ब्रास आहे. त्या तुलनेत वाळूचा तुटवडा जाणवू लागला आहे. सध्या नदीपात्रांसह ओढ्यातील वाळू उपसाही बंद आहे. मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असल्याने रोजची वाळूची गरज भागवली जाईना. परिणामी सातारा शहर व परिसरातील अनेक बांधकामे रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वाळूचा तुटवडा असल्याने वाळूला भलताच भाव आला आहे. गेल्या वर्षी पाच-साडेपाच हजारांनी मिळणाऱ्या वाळूचा दर आता प्र तिब्रास सात ते आठ हजारांपुढे गेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्पांमध्ये गुंतवणूक केल्याने बांधकामासाठी मिळेल तिथून वाळू उपलब्ध करण्याकडे बिल्डर लोकांचा कल आहे.दुसरीकडे गवंड्यांकरवी स्वतःचे छोटेसे घर उभारणारे नागरिक, शासनाच्या घरकुल योजनांमधून घराचे स्वप्न साकार करणारे सर्वसामान्य हतबल झाले आहेत. घरकुल योजनेतून प्रस्ताव दाखल झाला त्यावेळी वाळूचा जेवढा दर होता त्यात आता मोठीच वाढ झाली आहे. दरवाढीबरोबरच वाळू उपलब्ध कशी करायची हाही यक्ष प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. बांधकामे रखडल्यास गवंडी, सेन्ट्रींग कामगार, गवंड्यांच्या हाताखाली काम करणारे मजूर यांचाही रोजगार कमी होणार आहे.

बेसुमार वाळू उपशामुळे निसर्गाची व जैवविविधतेची हानी होत असते. तथापि, वाळू उपसा बंद असल्याने बांधकाम व्यवसायातील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक, वाळू व्यावसायिक व प्रशासन यांनी यावर समन्वयातून तोडगा काढण्याची गरज आहे.

– प्रद्युम्न आगटे,
बांधकाम व्यवसायिक

नियम धाब्यावर बसवल्याने नदीपात्रांची चाळण

नियम धाब्यावर बसवून अमर्याद वाळू उपसा केल्यामुळे नदीपात्रांची चाळण होत होती. तसेच नदीत सक्‍शन पंप लावून तसेच अन्य मार्गाने होत असलेल्या वाळू उपशामुळे नद्यांचा नैसर्गिक स्त्रोत, जलचर प्राणी तसेच जैवविविधता यावरही विपरीत परिणात होत होता. यामुळे हरित लवादाने वाळू उपशाबाबत कडक धोरण अवलंबले आहे. वाळू ठेका घेताना मोठी बोली लावावी लागते. त्यामुळे वाळू सम्राट वाळू उपसा करताना फक्त पैसा कसा वसूल होईल एवढेच पाहतो. महसूल खात्याने केलेल्या कारवायांनाही वाळू सम्राट बधत नाहीत. वाळू सम्राटांच्या अमर्याद हावरटपणामुळेच आज ही परिस्थिती ओढवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)