जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार

एमएसआरडीसीकडून नऊ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव

पुणे –
जुना पुणे-मुंबई महामार्गावरही वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी नऊ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविला आहे. त्यामुळे जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाहतुकीचा वेग वाढणार आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात घडतात. त्यामुळे दरडी काढण्याच्या कामादरम्यान किंवा मोठा अपघात होऊन वाहतूक कोंडी झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक जुना पुणे-मुंबई महामार्गावर वळवली जाते. तसेच सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागतात.

त्याचबरोबर जुना पुणे-मुंबई महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरही वाहनांची संख्या वाढली आहे. नागरिकरणामुळे महामार्गावरील चौकात यु-टर्न घेण्यासाठी तसेच पलीकडे वळण्यासाठी मुख्य रस्त्यावरून जावे लागते. त्यामुळे एखाद्या वाहनाने वळण घेण्यासाठी गाडी थांबली तरी पाठीमागे वाहनांच्या रांगा लागतात. या सर्व पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे-मुंबई महामार्गावर नऊ ठिकाणे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. यामुळे देहूरोड ते लोणावळ्यापर्यंत नऊ ठिकाणी उड्डाणपूल होणार असल्याने सरळ वेगाने वाहने पुढे जाणार आहेत. त्यामुळे या प्रमुख नऊ चौकांत होणारी वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार असून ज्या प्रवाशांना रस्ताच्या पलिकडे अथवा वळण घ्यावयाचे आहे. अशा प्रवाशांना उड्डाणपुलाखाली जाता येणार आहे.

जुना पुणे-मुंबई महामार्गाचा वापर प्रामुख्याने लोणावळा, तळेगाव, कामशेत या ठिकाणी जाण्यासाठी करण्यात येतो. या महामार्गावरून पुढे द्रुतगती महामार्गावर सुद्धा जाता येते. नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. जुना पुणे-मुंबई महामार्गवार तळेगाव येथे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. तळेगाव, वडगाव मावळ, चाकण येथे औद्योगीकीकरण वाढल्याने जड वाहतुकीचे प्रमाणही जास्त आहे.

या सर्व बाबींचा विचार करून एमएसआरडीसीने जुन्या महामार्गावर नऊ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविला आहे. प्राधिकरण यासाठीचा निधी एमएसआरडीसीला देणार असून या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चारशे कोटींचा खर्च अपेक्षित
सोमाटणे फाटा, लिंब फाटा, तळेगाव चाकण रस्ता, एमआयडीसी वडगाव, देहूरोड वाय जंक्‍शन, वडगाव फाटा, निगडी फाटा ते कामशेत, कार्ला फाटा, कान्हे फाटा अशा नऊ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन एमएसआरडीसीने केले आहे. यासाठी सुमारे चारशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर निविदा काढून या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)