उन्हाच्या तीव्रतेमुळे बाजारपेठ पडली ओस

लोणंदला पारा वाढला 
प्रशांत ढावरे

लोणंद  – लोणंद परिसरात गेल्या एक महिन्यापासून उन्हाचा पारा वाढत आहे. तर रात्रीच्या वेळीदेखील उकाडा वाढला आहे. गुरुवारी, दि. 28 दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येथील तापमान सुमारे 38 अंशापर्यंत गेल्याने लोणंद आणि परिसरात बाजार दिवस असूनही अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांनी रसवंतीगृह शीतपेयांच्या दुकानात गर्दी करून जीवाला गारवा मिळवण्याचा प्रयत्न करतांना दिसत होते. येत्या काही दिवसात तापमान 40 अंशावर जाणार असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक काळजी घेताना दिसत आहेत. उन्हाची तीव्रता चांगलीच वाढलेली असल्याने इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या दुकानातून पंखा, कुलर खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढलेली दिसू लागली आहे. कुंभारवाड्यात गरिबांच्या फ्रिजलासुद्धा मागणी वाढत आहे. ती पुढे आणखीन वाढणार असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

रखरखत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या टोप्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. विविध प्रकारचे गॉगल, टोप्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. शरीराला गारवा निर्माण करणाऱ्या द्राक्ष, टरबूज, काकडी यासारख्या फळांना मागणी वाढली आहे. विविध प्रकारचे ज्यूस, ताक, लस्सी, आईसक्रीम, कुल्फी याबरोबरच नारळपाणी, लिंबू सरबत आदी नैसर्गिक थंड पेयांना देखील मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर उसाचा रस घेण्याकरीता रसवंतीगृहे हाउसफुल होत आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सूर्य आग ओकू लागला आहे. गेल्या दहा बारा दिवसांपासून येथील तापमान 35-36 अंश इतके नोंदवले जात होते. मात्र गुरुवारी पारा 38 अंशावर गेल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. ऐन दुपारच्यावेळी आठवडा बाजार असूनही कोणी बाहेर पडायला तयार नसल्याचे चित्र दिसत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)