उन्हाच्या तडाख्याने झाडे लागली करपू

वृक्ष लागवड होते; संवर्धनाचे काय हा प्रश्‍न?
गुरुनाथ जाधव
सातारा – सातारा शहरासह परिसरात उन्हाच्या तडाख्याने झाडे करपू लागल्याचे चित्र दिसत आहे. उन्हाच्या तडाख्यात माणसांना देखील अंगाची लाही लाही होत असताना. पाण्याविना तडफणाऱ्या वृक्षाकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

सातारा प्रशासकीय इमारती शेजारील अतिक्रमणे काढून आता नाल्याचे काम सुरू केले आहे. तेथील झाडे आज उपटून काढली आहेत. सातारा शहरात वृक्ष लागवड तसेच संवर्धनासाठी नामवंत संस्थेकडे ठेका देण्यात आला होता. या संस्थेच्या माध्यमातून शहरात विविध भागात, प्रमुख रस्त्यावर लाखो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांच्या संरक्षणासाठी टिकाऊ असे ट्री गार्ड देखील बसवले होते. सातारा शहर परिसरात नगरपरिषदेच्या वृक्ष विभागाने अत्यंत चांगली कामगिरी केली. आजपर्यंत शहरातील कित्येक वृक्षांची गणना करण्यासोबतच लावलेल्या झाडाचे संवर्धन करण्याचा निर्धार केला पण त्याचा विसर पडला की काय हे समजेनासे झाले.

सातारा नगरपालिकेने स्मार्ट सिटी ग्रीन सिटीच्या अंतर्गत शहरातील मोकळ्या जागेवर विशेषतः रस्त्याकडेला हजारो वृक्षांची लागवड केली. परंतु हे लावलेले वृक्ष सध्या पाण्याविना करपून चालले आहेत. यामुळे “सुंदर सातारा हरित सातारा’ या संकल्पनेला हरताळ फासला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. शहराच्या अनेक भागातील वृक्षांची दयनीय अवस्था पाहून वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.

वृक्ष लागवडीचा फार्स करणारे संवर्धनाकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. शहरात लावण्यात आलेली झाडे जगली पाहिजेत. आता सद्य परिस्थितीत लावण्यात आलेली लाखो झाडे पाण्याअभावी करपून त्यांचा जीव जाईल अशी परिस्थिती तयार झाली आहे. सद्य परिस्थितीत वृक्षविभागाच्या अधिकारी तसेच संबंधित कंपनीच्या ठेकेदारांनी या वृक्षांची होणारी परवड थांबवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक बनले आहे.

निधीचा विनियोग जाहीर करावा

वृक्ष लागवडीसोबत संवर्धनासाठी शासनस्तरावर लाखो रुपयांचा निधी दरवर्षी मिळत असतो. त्याचा विनियोग कसा केला जातो. त्याचे ऑडिट नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने जाहीर करावे अशी नागरिकांची तसेच वृक्षप्रेमींची मागणी आहे. सातारा शहरातील मिळकत दारांच्या रूपातून वृक्ष निधी घेतला जातो. हे पैसे नगरपालिकेच्या तिजोरीत जमा होतात. त्याचा सुयोग्य विनियोग शहरातील वृक्षांची अवस्था सुस्थितीत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्‍यक झाले आहे. शहरातील विविध भागात वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते परंतु झालेल्या खर्चाची पडताळणी प्रत्यक्षात मात्र होत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)