प्रभात रस्त्याचे पदपथ खोदल्याने प्रचंड वाहतूक कोंडी

अपूर्ण काम लवकर पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

पुणे  – गेल्या अनेक दिवसांपासून खोदलेले पदपथ… त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी… यामुळे प्रभात रस्त्यावरील नागरिक प्रचंड वैतागले आहेत. केवळ तेथील रहिवासीच नव्हे, तर या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनाही वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रभात रस्त्यावर डेक्‍कन पोलीस ठाण्यापासून दोन्ही बाजूला पदपथ उखडून ठेवले आहेत. त्यामुळे नागरिकांना चालणे दुरपास्त झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यातून या रस्त्यावर चारचाकी आणि दुचाकी गाड्या पार्किंग केल्या जात असल्याने हा रस्ता आणखीनच अरुंद झाला आहे. त्यामुळे येथील गल्लीबोळांना जोडणारे चौक, रस्ते यांवर रोजच प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सकाळी कार्यालये सुरू होताना आणि संध्याकाळी सुटताना वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

याशिवाय कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने तेथील वाहतूक कोंडीत अडकू नये म्हणून, कर्वे रस्त्यावरील बरीचसे वाहनचालक प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता येथील गल्लीबोळांचा वापर करत आहेत. त्यामुळे प्रभात रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण आला आहे. त्यातून पदपथाचे काम रेंगाळल्याने वाहतूक कोंडीत आणखीच भर पडली आहे.
याशिवाय “मॉर्निंग वॉक’ला जाणारे बहुतांश प्रभात रस्त्यावरील पदपथाचा वापर करतात; परंतु पदपथच उखडल्याने वेगाने येणाऱ्या वाहनांचा सामना करत जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. पदपथाचे रुंदीकरण करून, अत्यंत चांगल्या दर्जाचे पदपथ करणार असल्याचे महापालिकेच्या पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.मात्र, रखडलेले हे काम कधी पूर्ण करणार याची “डेडलाईन’ त्यांना सांगता आली नाही. लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)