वाठार स्टेशन परिसरातील दीपावलीच्या तोंडावर दुष्काळाचे सावट

वाठार स्टेशन – वाठार स्टेशन ही कोरेगाव तालुक्‍यातील प्रमुख आणि महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथे शाळा, हॉस्पिटल, महाविद्यालय, राष्ट्रीयकृत बॅंका, मोठी बाजारपेठ यांचा समावेश होतो. वाठार स्टेशन ही महत्त्वाची बाजारपेठ असल्यामुळे परिसरातील विखळे, जाधववाडी, फडतरवाडी, दाणेवाडी, तळीये, बिचुकले, नलवडेवाडी, गुजरवाडी, देऊर, पळशी व भाडळे खोरे येथून खरेदीसाठी लोक येत असतात. परंतु, यावर्षी पावसाळा कमी झाल्यामुळे पैसे देणारी पिके घेवडा, बटाटा यांच्यावर संक्रात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा राहिला नाही.

तोंडावर दिवाळी सण आल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असून नवीन कपडे, फटाके, किराणामाल, इलेक्‍ट्रिक दुकाने, सराफाची दुकाने याकडे पाठ फिरवली आहे. शेतकरी वर्गाकडे खिशात पैसा नसल्यामुळे वाठार स्टेशनची बाजारपेठ ओस पडली आहे. वाठार स्टेशनच्या व्यापाऱ्यांनी फटाका स्टॉल, कपड्यांची दुकाने, इलेक्‍ट्रिक दुकाने, सराफ दुकाने मोठ्या थाटामाटात उभारले असून ग्राहकांची वाट बघत बसले आहेत. महाराष्ट्र शासनाने नुकताच दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामध्ये कोरेगाव तालुका मध्यम स्वरूपाचा दुष्काळी भाग असल्याचा घोषित केला आहे. वास्तविक पाहता कोरेगाव तालुक्‍यामध्ये विशेषतः उत्तर कोरेगावमध्ये पावसाचे प्रमाण एकदम कमी असून याठिकाणी लोकांना पिण्यास पाणी नाही.

जनावरांना चारा नाही, पेरण्या नाही, तलाव, नालाबंडिंग, विहिरी पूर्णपणे कोरड्या असून, पाणी नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत शंभर टक्के दुष्काळ जाहीर केला पाहिजे. तथापि, महाराष्ट्र शासनाने उत्तर कोरेगाववर मोठा अन्याय केला आहे. त्यामुळे जनतेतून नाराजीचा सूर उमटला आहे. पैसा व पीक पाणी नसल्यामुळे लोकांची दिवाळी कोरडी जाणार का? असा प्रश्न जनतेला व शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने उत्तर कोरेगावला शंभर टक्के दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी शेतकरी व जनतेतून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)