आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती : जिल्हाधिकाऱ्यांसमोर वास्तवता मांडली
रेडा – इंदापूर तालुक्यातील उजनी काठच्या शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा केला जाणार आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. इंदापूर तालुक्यातील भीषण दुष्काळ निवारणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, आदी मागण्यांसाठी शुक्रवार (दि. 10) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बॅंकेचे चेअरमन रमेश थोरात यांनी जिल्हाधिकारी राम यांची भेट घेतली.
यावेळी आमदार भरणे यांनी तालुक्यातील पाणीटंचाई, चाऱ्याचा प्रश्न, पाण्याअभावी जळालेली पिके, रोजगार हमी योजनेची कामे आदी विषयांवर गाऱ्हाणी मांडली. यावेळी उजनी पाणलोट क्षेत्रातील जास्तीचे पाणी सोलापूरला नेण्यासाठी इंदापूर, दौंड आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या कृषिपंपासाठी लागणारी वीज कपात केली जात आहे. अवघी दोन तास वीज दिली जात असल्याचे आमदार भरणे यांनी निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, उजनीच्या पाण्यावर आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्क असून यापुढे उजनी काठच्या शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्याबाबत कार्यवाही करू. इंदापूर तालुक्यात पाण्याअभावी जळालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन हा प्रस्ताव नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठवू. पाणीटंचाईग्रस्त गावांकडून मागणी होताच कोणतेही नियम न लावता पाण्याचे टॅंकर सुरू करण्यात येईल. याशिवाय चारा छावणीचे प्रस्ताव मिळताच मंजुरी देण्यात येईल. रोहयोच्या कामाची संख्या वाढवून नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राम यांनी दिले.
यावेळी माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील उपस्थित होते.