आचारसंहितेमुळे अनेक यात्रांत मनोरंजनाच्या कार्यक्रमांना फाटा

रहिमतपूर – हनुमान जयंतीच्या कालावधीत रहिमतपूर परिसरातील अनेक गावांची यात्रा पार पडली. परंतु, सर्वच गावात आचारसंहितेचा बागुलबुवा दाखवत करमणुकीच्या कार्यक्रमांना परवानगीच मिळाली नाही. त्यामुळे यात्रा साधेपणाने साजऱ्या झाल्या. एका गावात तर तमाशा पार्टी उभी न राहताच पस्तीस हजार रुपये घेऊन गेल्याचा प्रकारही घडला आहे.

ग्रामीण भागात यात्रेचा हंगाम सुरू झाला आहे. रहिमतपूर परिसरात जवळपास अठरा गावातील यात्रा हनुमान जयंतीला होती. यामध्ये धामणेर, रहिमतपूर, सुर्ली, तारगाव, टकले या गावाच्या यात्रा संपन्न झाल्या. यात्रेच्या मोक्‍यावर पुणे-मुंबईतील चाकरमानी गावाकडे येतात. शाळांना ही सुट्टी लागलेली असते. पै-पाहुणे एकत्र येण्यासाठी यात्रा हेच निमित्त ठरते. गावातील ग्रामस्थही यात्रेचे नेटके नियोजन करत वर्गणी गोळा करत सलग तीन-चार दिवस करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करतात. परंतु, यावर्षी लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. रहिमतपूर पोलिस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी यात्रा असणाऱ्या गावात आचारसंहितेचे कडक पालन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. यामुळे जवळपास सर्वच गावात करमणुकीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)