परप्रांतीयांची वाढती संख्या भूमीपुत्रांसाठी धोक्‍याची

उपनगराकडे वाटचाल करीत असलेल्या सासवड, जेजुरी, नीरा शहरात परप्रांतीयांची वाढती संख्या सध्या गंभीर समस्या बनत चालली आहे. पुणे शहरातून परप्रांतीयांचे लोंढे सध्या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात येत असल्याने अगोदरच बेरोजगारी आणि घटत्या दरडोई उत्पन्नाचा सामना करणारे भूमीपुत्र हवालदिल झाले आहेत. अगोदरच पुरंदरकरांच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ, पाणीटंचाई, शेतीचे घटते उत्पादन व उत्पन्न, निसर्गाचा असमतोलपणा, अत्यल्प पर्जन्यमान या सर्व प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीला तोंड देत केवळ शेती व्यवसायाचा आधारावर टिकलेला भूमीपुत्र परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येमुळे देशोधडीला लागण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे.

आधुनिक काळात जातीनिहाय व्यवसायांचे बंधन राहिलेले नसले तरी सुद्धा स्थानिकांनाच विशिष्ट रोजगार आणि व्यवसायांमध्ये अग्रक्रमाने संधी मिळणे हे क्रमप्राप्त असते. मात्र, सध्या परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येमुळे रोजगाराच्या संधीमध्ये घट होत चालली आहे. अगोदरच सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यातच परप्रांतीयांमुळे भविष्यात स्थानिकांना व्यवसाय व रोजगारांमध्ये संधी उपलब्ध राहतात की नाही, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

जेजुरी, नीरा आणि सासवड या भागांतील कंपन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने कामगार भरती मोठ्या प्रमाणावर केली जाते. कंत्राटदार जरी स्थानिक असला तरी कमी पगारावर राबणारे कामगार मिळत असल्यामुळे कंपन्या आणि कंत्राटदार यांचाही परप्रांतीय कामगार भरतीवरच अधिक भर असल्याचे दिसून येत आहे.पारंपरिक व्यवसायांच्या बाबतीतही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. काही पारंपरिक व्यवसाय हे स्थानिकांसाठीच राखीव असायला हवेत, कारण तोच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सुतारकाम, गवंडीकाम, लोहारकाम, बांधकाम, हॉटेल व्यवसाय, साफ-सफाई, रंगकाम या व्यवसायावर परप्रांतीयांनी अतिक्रमण करण्याचा सपाटा सुरू केला आहे. यामुळे तालुक्‍यातील भूमिपुत्रांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध राहत नाहीत. परिणामी तालुक्‍यातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा प्रकारे परप्रांतियांच्या आक्रमणामुळे भूमिपुत्रांचा रोजगार आणि व्यवसायावर गदा आली आहे.

परप्रांतीय हे केवळ पैसे कमावण्यासाठीच येत आहेत आणि कमवलेला पैसा हा त्यांच्या राज्यात खर्च करण्यासाठी घेऊन जात आहेत. यामुळे तालुक्‍यातील भांडवलाचा चलन प्रवाह खंडित होण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. कारण फिरते भांडवल हे जर दुसऱ्या प्रांतात गेले तर तालुक्‍यातला चलन प्रवाह खंडित होऊन आर्थिक उलाढालीवर परिणाम होऊ शकतो.

संविधानाने प्रत्येक नागरिकाला देशातील कोणत्याही प्रांतात नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास आणि रहिवासाचे स्वातंत्र्य दिलेले आहे. यावर गदा आणणे देखील योग्य नसले तरी स्थानिकांनी ही या बाबीची गंभीर दखल घेऊन आपल्या कामाची पद्धती आणि स्वतःच्या स्वभावात बदल करणेही गरजेचे आहे. कामाची तत्परता व अचुकता, दिलेल्या वेळेतच काम पूर्ण करणे, कमी पगारात जास्त काम करण्याची तयारी ठेवणे, विनम्रता कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची तयारी या गुणांमुळे परप्रांतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

तालुक्‍यात येणाऱ्या परप्रांतीयांची पोलीस प्रशासनाकडे नोंद असणे गरजेचे आहे. प्रत्येक परप्रांतीयाचे आधारकार्ड, त्याचा संपर्क क्रमांक, फोटो हा असायला पाहिजे. नाहीतर गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तालुक्‍यात येणाऱ्या परप्रांतीयांची पोलीस प्रशासनाकडे नोंद नसणे ही देखील अतिशय गंभीर बाब आहे. कारण या ठिकाणी गुन्हे करून हे परप्रांतीय त्यांच्या राज्यात गेल्यानंतर त्यांना शोधून काढणे व त्यांची ओळख पटवणे हे अशक्‍यप्राय बनते. एकंदरीत परप्रांतीयांची वाढती संख्या हे भूमिपुत्रांसाठी धोक्‍याची घंटा बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)