कृष्णा पात्रातील दुर्गंधीमुळे दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी त्रस्त

नाकावर रुमाल ठेवून केली पाहणी : हरित लवादाच्या निकालाकडे वाईकरांचे लक्ष

वाई –
सध्या हरित लवादाकडे कृष्णा नदी पात्रातील सिमेंट संदर्भात सुरू असलेल्या दाव्यांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज दुपारी बंद कामाची पाहणी केली. साचलेल्या सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनीही नाकावर रुमाल ठेवून स्थळाची पाहणी केली. स्थळ पाहणीचा अहवाल त्या लवादाकडे लवकरच पाठवणार असल्याचे समजते. दरम्यान, या बहुचर्चित कामाच्या निकालाकडे वाईकरांचे लक्ष लागले आहे.

वाई नगरपालिकेच्या वतीने कृष्णा नदी पात्राच्या दक्षिणेस सुशोभिकरणासाठी सिमेंट कॉंक्रीटने सपाटीकरण करण्यात आले आहे. प्रत्यक्ष काम सुरू असताना पुण्यातील एका पर्यावरणवादी संघटनेने संबंधित कामकाजासंदर्भात हरकत घेतली. नैसर्गिक नदीप्रवाह बंद करण्याचा हेतू असल्याचा ठपका ठेवून पालिकेच्या विरोधात तक्रार हरित लवादाकडे करून हे काम तत्काळ बंद करण्यात यावे अशा स्वरूपाचा दावा त्या संघटनेने वर्षांपूर्वी दाखल केला होता. सध्या या दाव्याची लवादाकडे सुनावणी सुरू आहे. या कामसंदर्भातला प्रशासनाचा अहवाल हरित लवादाने मागवला आहे. यासाठी जिल्हाधिकारी सिंघल यांनी आज दुपारी कृष्णा नदीपत्राची पाहणी केली व पालिका प्रशासन प्रांताधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांचेकडून सिमेंट कॉंक्रीटच्या कामाची माहिती घेतली.

यावेळी उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी सिमेंट कॉंक्रीट कामाच्या सुशोभीकरणामागची भूमिका विशद करताना जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, नदीपात्राच्या दक्षिणेकडील बाजूकडे प्रचंड घाणीचे साम्राज्य होते. मैला व सांडपाण्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली होती. एकूणच कृष्णा नदीच्या सौंदर्याला या दलदलीच्या परिसरामुळे बाधा पोहोचली होती. या सर्व गोष्टींचा विचार करून वाईकरांच्या आग्रहाखातर या परिसराचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने पालिकेच्या सभागृहात तसा ठरावही संमत करण्यात आला होता. आ. मकरंद पाटील यांनीही पर्यटन विकास निधीतून मोठा निधी मंजूर करून आणला होता. जेष्ठ नागरिकांना व लहान मुलांना या परिसरात बसून आनंद घेता यावा या उद्देशातून हे काम गतीने सुरू होते. सिमेंट कॉंक्रीट करताना नदीपत्राचा प्रवाह कोठेही अडवण्यात किंवा वळवण्यात आलेला नाही. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून सावंत यांनी नदीपात्राचा नैसर्गिक प्रवाह जशाचा तसा ठेवून कॉक्रीटीकरण करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी बंद ठेवण्यात आलेल्या या कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना तेथे सुटलेल्या दुर्गंधीमुळे नाकावर रुमाल ठेवत पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, मुख्याधिकारी विद्या पोळ, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, नगरसेवक राजेश गुरव, प्रदीप जायगुडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)