पाण्यासाठी माझ्यावर भीक मागण्याची वेळ! : खडसेंची उद्वीग्नता 

राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर

मुंबई: राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे. पण दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही, हे सरकार दुष्काळाचा पोरखेळ करीत आहे. तीन-तीन महिने पाठपुरावा करून पाणी मिळत नसेल तर लोकांनी जगायचे कसे? असा सवाल करीत माझ्या मतदारसंघात पिण्याच्या पाण्यासाठी माझ्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे, अशी उद्विग्नता व्यक्त करीत भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला

विधानसभेत आज दुष्काळावर सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या 293 अन्वये प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत एकनाथ खडसे यांनी सरकारवर तिखट शब्दात हल्ला चढवला. सरकारने राज्यात दुष्काळ जाहिर केला आहे. दुष्काळाशी सामना करायला प्रशासन सज्ज असायला हवे होते. पण आज प्रशासनाकडे कर्मचारीच कमी असल्याची वस्तूस्थिती मांडतानाच पाणीटंचाईच्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडे मी स्वत: तीन महिने पाठपुरावा करीत आहे. मात्र तीन-तीन महिने पाठपुरावा करूनही पाणी मिळत नसेल, तर लोकांनी जगाचे कसे? असा संतापजनक सवाल त्यांनी केला.

ते म्हणाले की, ग्रामपंचायत भागात टॅंकरची मागणी करायची असेल तर ती ग्रामसेवकांच्या माध्यमातून करावी लागते. मात्र अनेक गावात ग्रामसेवकच नाहीत. त्यामुळे प्रस्ताव कुणाच्या सहीने पाठवायचा असा, प्रश्न आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील रिक्तपदे भरली पाहिजेत. जे अधिकारी आहेत, त्यांच्यातही समन्वय नाही, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार वाढवा 
दुष्काळच्या काळात शेतकऱ्यांचे कनेक्‍शन तोडू नये, असे निर्देश आहेत. पण दणादण कनेक्‍शन तोडली जात आहेत. याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो तर ते म्हणतात, ते अधिकारी माझे ऐकत नाहीत. दुष्काळाच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार वाढविले पाहिजेत. मी मदत आणि पुनर्वसन मंत्री असताना दुष्काळ निवारणाच्या कामात एखादा अधिकारी हलगर्जीपणा करीत असेल, तर त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार मी जिल्हाधिकाऱ्याला दिले होते. तृतीय आणि चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्यांना तर थेट निलंबित करण्याचे अधिकारही जिल्हाधिकाऱ्याला दिले होते. तसेच आताही जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार वाढविण्याची गरज आहे. पाणी पुरवठा करणे, मागणी प्रमाणे टॅंकर सुरू करणे याचे अधिकारही जिल्हाधिकाऱ्याला वाढवून दिले पाहिजेत. पाण्यासाठी लोकांना भीक मागावी लागत असेल तर ते सरकारला शोभा देणारे नाही. त्यामुळे किमान लोकांना पिण्याचे पाणी कसेल मिळेल यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही खडसे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)