राज्यावर दुष्काळाचे सावट गडद

खरीपाच्या पिकावर संकट : उ. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरसरी पाऊस कमी


कृषी विभागाच्या अहवालात खरीपाचे उत्पन्न 40 टक्‍क्‍यांनी घसरणार

पुणे – सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारली. आतातर पावसाचा कालावधीसुद्धा संपला आहे. त्यामुळे खरीपाच्या पिकांवर संकट ओढवले आहे. राज्यातील काही भागात तर, दिड महिन्याहून अधिक काळ झाला तरी पाऊस पडला नसल्याने पाण्याअभावी जमिनीला भेगा पडल्या आहेत. तर उन्हामुळे पिकेही सुकू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने आतापासूनच याबाबतची पावले उचलली नाही तर, भविष्यात राज्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल.

राज्याच्या विविध भागातील पावसाचा आढावा घेतला असताना मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. राज्याच्या कृषी विभागानेही याबाबत प्राथमिक अहवाल तयार केला आहे. त्यात खरीपाचे उत्पादन 40 टक्‍क्‍यांनी घसरण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. ऐन दाने भरण्याच्या कालावधीतच पावसाने ओढ दिल्याने उत्पादनात घट होईल, असा अंदाज आहे. परतीच्या पावसानेसुद्धा फारशी समाधानकारक हजेरी लावली नसल्याने राज्यातील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी घट होऊ लागली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून अनेक भागात पावसाची उघडीप आहे. मात्र, काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत होता. सप्टेंबर महिन्यात मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात सर्वत्र पाऊस थांबला. यातच राज्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच बाजूंनी पिकांना फटका बसत आहे. कोकण, नागपूर विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दिलासा दिला आहे. मात्र, नाशिक, औरंगाबाद, अमरावती जिल्ह्यांत परिस्थिती खूपच चिंताजनक झाली असून, पुणे विभागातही अडचणी वाढल्या आहेत. या चार विभागातील पंधरा जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस पडला आहे.

सप्टेंबर महिन्यातील पावसाचा विचार करता, राज्यातील एकूण 353 तालुक्‍यांपैकी 325 तालुक्‍यांत 50 टक्‍क्‍यांहून कमी तर, 254 तालुक्‍यांत 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. यातही तब्बल 45 तालुक्‍यांमध्ये पावसाचा थेंबही पडला नसल्याचे चित्र आहे. तर, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर तालुक्‍यात सर्वाधिक 21 टक्के, तर कोल्हापूरमधील शाहूवाडी तालक्‍यात 113 टक्के पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. काही तालुक्‍यांत पावसाची सरासरी चांगली असली तरी, या तालुक्‍याच्या बहुतांशी भागात दखलपात्र पाऊसच झालेला नाही. नगर जिल्ह्यातील सर्वाधिक तालुक्‍यात पावसात मोठा खंड पडला आहे.

राज्यावर आता दुष्काळाचे सावट असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शासनाने आतापासून याबाबतच्या उपाययोजना राबविण्यास सुरूवात करणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली असताना त्यांनीसुद्धा राज्यातील पिकांची स्थिती विदारक असल्याचे स्पष्ट केले. याबाबत अधिक माहिती शेतकरी नेते डॉ. अजित नवले म्हणाले की, आता राज्य शासनाने तातडीने काही पावले उचलण्याची गरज आहे. त्या सर्व प्रथम पिक विमा योजनेअंतर्गत ज्यांनी पिक विमे काढले आहेत, त्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून विम्यासाठी क्‍लेम फाईल करावे म्हणजे ते पैसे शेतकऱ्यांना मिळतील.

त्यानंतर कृषी विभागाने तातडीने सर्वे करून ज्याठिकाणी आणेवारी घसरली आहे, त्याठिकाणी दुष्काळ निवारण निधी आणि आर्थिक भरपाई देण्यासाठी प्रयत्न सुरू करावेत. खरीपाचे तर, नुकसान होणारच आहे; पण आगामी काळात पाण्याची तीव्र टंचाई जाणविणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आतापासूनच पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागणार आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्‍न सुद्धा उद्‌भवणार आहे. त्याबाबत देखील शासनाने तयारी सुरू केली पाहिजे, असे ही नवले यांनी सांगितले.

पाऊस पडला नाही, असे तालुके
उरण (रायगड), नांदगाव, देवळी (नाशिक), शिरपूर, शिंदखेडा (धुळे), शहादा (नंदूरबार), जळगाव, मुक्ताईनगर, अमळनेर, धरणगाव (जळगाव), नगर, पारनेर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहूरी, संगमनेर, कोपरगाव, राहाता (नगर), शिरूर, बारामती (पुणे), पंढरपूर (सोलापूर), आटपाडी (सांगली), औरंगाबाद, पैठण, वैजापूर (औरंगाबाद), जालना, अंबेड, बदनापूर, घनसांगवी (जालना), पाटोदा, आष्टी, धारूर (बीड), परभणी, पाथरी, जिंतूर, मानवत (परभणी), हिंगाली (हिंगोली), देऊळगाव राजा (बुलडाणा), तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर (अकोला), रिसोड (वाशिम).

मराठवाड्यात अत्यल्प पाणीसाठा
पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून, सर्व प्रकल्पामंध्ये मिळून 71.14 टीएमसी म्हणजेच अवघा 27 टक्‍के पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणात अचल आणि उपयुक्त पाणीसाठा मिळून (टीएमसी 58.04 (57 टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील उर्वरित धरणांमधील पाणीसाठा स्थिती अत्यंत चिंताजनक असून माजलगाव, मांजरा (बीड), सीना कोळेगाव (उस्मानाबाद) या धरणांनी तळ गाठला आहे. येलदरी धरणात अवघा 9 टक्‍के पाणीसाठा आहे. विभागातील मोठ्या 45 प्रकल्पांमध्ये 48.23 टीएमसी ( 30 टक्के), मध्यम 81 प्रकल्पांमध्ये 8.76 टीएमसी (23 टक्के), तर लहान 839 प्रकल्पांमध्ये 14.16 टीएमसी ( 22 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)