पाण्याचा, नव्हे नियोजनाचाच दुष्काळ!

गणेश आंग्रे

पुणे – मुबलक पाऊस पडून आणि धरणे तुडुंब भरूनही दरवर्षी पाणीटंचाईचा प्रश्‍न नित्याचाच झाला आहे. यंदाही धरणक्षेत्रात मान्सून समाधानकारक झाला. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे यंदा 100 टक्के भरली. खडकवासला धरणातून पुढे मुठा नदीत सुमारे 19 टीएमसी पाणी पावसाळ्यादरम्यान सोडण्यात आले. अशी परिस्थिती असतानासुद्धा पावसाळा संपतो न संपतो, तोच ऑक्‍टोबरमध्येच नागरिकांना पाणीटंचाईच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यातून पाण्याची कमतरता नसून संबधित यंत्रणेकडून नियोजनाचाच दुष्काळ असल्याचे आता दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील काही वर्षांपासून दरवर्षी पाण्यावरून राजकारण रंगते. कालव्यात पाणी सोडण्याच्या विषयावरूनही शहरी आणि ग्रामीण असा वादही दरवर्षीचाच झाला आहे. पुढील वर्ष तर निवडणुकांचे असल्याने राजकारणातील कलगीतुरा रंगला आहे. यात आता पाणीप्रश्‍न आणखीनच पेटत आहे. ऑगस्ट महिन्यात धरणे भरली; त्यामुळे पुढील वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटली, असे गृहित धरण्यात आले. मात्र हा आनंद जास्त दिवस टिकणारा ठरला नाही.

सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने पाणी प्रश्‍न उभा राहिल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. ऐन दिवाळीत नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शासनाने पाण्याचे प्राधान्यक्रम ठरविले आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याला प्रथम, त्यानंतर शेती आणि उद्योग असा प्राधान्यक्रम आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणी पुणे शहराला पिण्यासाठी वापरले जाते. तसेच दौंड, इंदापूर आणि हवेली या तीन तालुक्‍यांसाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी ते कालव्यातून सोडण्यात येते.

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत 84 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला पिण्यासाठी आवश्‍यक पाणी, शेतीसाठी आवर्तने, बाष्पीभवन, काही ग्रामपंचायतींना लागणारे पाणी आदींचा विचार करून पाण्याचे नियोजन करण्याकडे अधिक लक्ष देण्याची आता गरज भासू लागली आहे. परतीचा पाऊस झाला नाही, हे एकच कारण सांगून पाणीकपात करण्यात आली आहे. धरणे 100 टक्के भरून सुद्दा जर पाणीकपात होत असेल, तर हे संबधित यंत्रणेचे अपयशच आहे, असे म्हणावे लागेल.

पाऊस झाल्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याकडे अजूनही दुर्लक्ष केले जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. सध्या पाणीकपातही याच नियोजनाचा भाग आहे, असे सांगितले जात आहे. पावसाळा संपल्यानंतर लगेचच असे करणे हा नियोजनाचा भाग नसून राजकारणाचा आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे केले जात आहे, हे देखील स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)