कोणी पाणी देता का पाणी ? हि ‘गावे’ भोगत आहेत दुष्काळाचा दाह

अती तीव्र दुष्काळी गावात समावेश करण्याची नागरिकांची मागणी

सुभाष शेटे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत असलेल्या शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील पठारी भागातील कान्हूर मेसाई परिसरातील आठ गावे व वाडया वस्त्यांवरील नागरिक व जनावरांना भीषण पाणी व चारा टंचाईस गेल्या एक महीन्यापासून तोंड द्यावे लागत आहे. पावसाळा अद्याप ८ ते ९ महिने दूर असल्याने नोव्हेंबर महिन्यातच या भागातील तीव्र पाणी टंचाईची दाहकता समोर येत आहे. त्यामुळे कोणी पाणी देता का पाणी ? म्हणण्याची कान्हूर मेसाई व परिसरातील ८ गावांवर आली आहे. तर या गावांचा शासनाने अती तीव्र दुष्काळी गावात समावेश करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

टँकर द्वारे येणारे पाणी भरण्यासाठी घरांपुढे बॅलर मांडण्यात आले आहेत

स्वातंत्रोत्तर काळानंतर अनेक निवडणुका झाल्या. या भागातील मह्त्वाचा असणारा पाणी प्रश्न निवडणुकी वेळी फक्त सोडविण्याचे आश्वासन देऊन या भागातील नागरिकांना पाण्यावाचून केवळ झुलवत ठेवण्याचा प्रकार लोकप्रतिनिधींनी केला असल्याचा आरोप आता पाण्यासाठी आर्त टाहो फोडणाऱ्या या परिसरातील नागरिकांमधून होताना दिसत आहे. वेळोवेळी पाणी प्रश्न सोडविण्याचे गाजर नागरिकांना दाखवत केवळ मतांसाठी  सातत्याने दुष्काळाचा सामना करत असलेल्या कान्हूर मेसाई व परिसरातील आठ गावांचा पाणी प्रश्न आत्तापर्यंत भिजवत ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या भागातील नागरिकांसाठी पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्याकामी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व सरकारकडे तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आता निर्माण झाल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गावातील कोरड्या पडलेल्या विहिरी

 

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील,पठारी भागात असलेल्या व सातत्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत असलेल्या कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी, मोराची चिंचोली, खैरेवाडी, खैरेनगर, शास् ताबाद, लाखेवाडी, वरुडे, वाघाळे, गारकोलवाडी, घोलपवाडी, फलकेवाडी, ढगेमळा, पुंडेवस्ती या परिसरात पाणी टंचाईचे भीषण संकट येथील नागरिकांसमोर उभे राहिले आहे.

विहिरी, तलाव, नाले, बोअरवेल पावसाअभावी अनेक ठिकाणी कोरडे पडले आहेत. त्यामुळे या भागातील पाण्याचे संकट आता अधिकच भीषण झाले आहे. पाळीव प्राण्यांचा,जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. रब्बी हंगाम सोडाच पण खरिपात ही येथील अनेक गावातील शेतकऱयांना नापिकीला सामोरे जावे लागले आहे. पाण्यावाचून माणसांनी व जनावरांनी जगायचे कसे व करायचे काय ? असा यक्ष प्रश्न या भागातील भीषण दुष्काळाची दाहकता सोसणाऱ्या नागरिकां समोर भेडसावत आहे.

ओसाड पडलेली शेतजमीन

पाणी टंचाईची दाहकता लक्षात घेत या गावातील नागरिक आता एकवटले असून सरकारने पाणी प्रश्न युद्धपातळीवर निर्णय घेऊन हा प्रश्न तातडीने कायमस्वरूपी मार्गी न लावल्यास आगामी निवडणुकांवर पूर्ण बहिष्कार टाकण्याचा इशारा कान्हूर येथील मेसाई मंदिरात झालेल्या पाणीपरिषदेत देण्यात आला आहे.

तर या दुष्काळी गावांतील नागरिकांची पाणी प्रश्ना बाबत भूमिका आता अधिकच तीव्र व परखड झालेली असल्याचे पाहावयास मिळत असून निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केवळ टँकरद्वारे पाणी देऊन तात्पुरती मलमपट्टी न करता सरकारने कायमस्वरूपी व ठोस निर्णय तातडीने घेऊन प्रत्यक्ष कृतीत या भागातील नागरिकांना बारा ही महिने पाणी मिळण्याकामी जलद उपाय योजना करण्याची गरज या भागातील टंचाईग्रस्त नागरिकांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)