ड्रायव्हिंग टेस्ट “कोटा’ वाढविल्याने दिलासा

लायसन्सचे वेटिंग कमी होण्याची चिन्हे

पुणे – नागरिकांना पक्‍क्‍या वाहन चालन परवान्यासाठी (पर्मनंट लायसन्स) करावी लागणारी प्रतीक्षा कमी होणार असल्याचे दिसत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ड्रायव्हिंग टेस्टचा “कोटा’ वाढवल्याने दि. 1 मेपासून “वेटिंग’ कमी होणार आहे. आरटीओने पक्‍क्‍या परवान्यासाठी “वाहन चालन प्रशिक्षण आणि संशोधन संस्थे’च्या (आयडीटीआर) टेस्ट ट्रॅकवर एक तारखेपासून 175 ऐवजी 225 जणांची टेस्ट घेणे शक्‍य होणार आहे.

पक्‍क्‍या वाहन परवान्यासाठी सध्या “आयडीटीआर’ येथील टेस्ट ट्रॅकवर पुणे शहरातील 100, तर पिंपरी चिंचवडच्या 75 अशा एकूण 175 जणांची चाचणी होत होती. पुढील महिन्यापासून यामध्ये बदल होऊन दररोज पुण्याच्या 150, तर पिंपरी चिंचवडच्या 75 अशा एकूण 225 जणांची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.
याबाबत “आयडीटीआर’ येथील कामाचे नियोजन करुन आणि अधिकाऱ्यांवर वाढणाऱ्या कामाच्या ताणाबाबत चर्चा सुरू आहे. या गोष्टींची शहानिशा करुन येत्या काळात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पुणे कार्यालयांतर्गत परवाना काढण्याची संख्या जास्त आहे. पक्का परवाना काढण्यासाठी उमेदवाराला ड्रायव्हिंग टेस्ट देणे गरजेचे असते. त्यामुळे नागरिकांना किमान दोन ते तीन महिने वेटिंगवर राहावे लागते. अनेकदा शिकाऊ परवान्याची (लर्निंग लायसन्स) मुदत संपूनही पक्‍क्‍या परवान्यासाठी अपॉइंटमेंट मिळत नसल्याने नागरिकांना पुन्हा शिकाऊ परवाने काढावे लागत होते. यामुळे नागरिक आणि ड्रायव्हिंग स्कूलच्या मागणीचा विचार करुन आरटीओने टेस्ट कोटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)