फक्त उद्यानांसाठी वापरले जातेय पाणी
शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर नाही : पालिकेचे टॅंकर पॉइंट ओसाड
पुणे – शहरातील काम सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांसाठी कोणत्याही स्थितीत पिण्याचे पाणी वापरू नये, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्तांनी तीन महिन्यांपूर्वी दिले आहेत. तसेच, या कामासाठी ठेकेदारांनी महापालिकेने शुद्ध केलेले सांडपाणी वापरावे, यासाठी सांडपाणी शुद्धीकरण केंद्रावर 9 ठिकाणी टॅंकर पॉइंटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांत एकाही केंद्रावरून रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी पाणी घेतले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा या कामांसाठी पिण्याचेच पाणी वापरले जात असल्याचे चित्र आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमालीचा खालावला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याने महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी “पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शहरातील महापालिकेची कामे तसेच सिमेंट रस्त्यांच्या कामासाठी कोणत्याही स्थितीत पिण्याचे पाणी वापरू नये,’ असे लेखी आदेश काढले आहेत. तसेच, “ठेकेदारांना पाणी हवे असल्यास त्यांनी महापालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्रावरील टॅंकर पॉइंटवरून शुद्ध केलेले सांडपाणी वापरावे,’ असेही आदेशात नमूद केले असून याची जबाबदारी पथ विभाग तसेच पाणीपुरवठा विभागाकडे दिली आहे.
पाणीपुरवठा विभागाने त्यानुसार, टॅंकर पॉइंट कार्यान्वित केले असून पथ विभागानेही ठेकेदारांना पत्र पाठवून रस्त्यासाठी शुद्ध केलेले सांडपाणी वापरण्याचे लेखी आदेश दिले आहेत. मात्र, पाणीपुरवठा विभागाकडे याबाबत माहिती घेतली असता; गेल्या तीन महिन्यांत एकाही ठेकेदाराने शुद्ध केलेले सांडपाणी घेतलेले नसल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी शहरभर ही कॉंक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे जर रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी पिण्याचे पाणी वापरले नाही. सांडपाणी घेतले नाही, मग काम करण्यासाठी पाणी आणले तरी कुठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आयुक्तांच्या आदेशानुसार, सर्व सांडपाणी शुद्धीकरण केंद्रावर टॅंकर पॉइंट उभारण्यात आलेले आहेत. मात्र, गेल्या तीन महिन्यांत या ठिकाणी एकही खासगी ठेकेदारांचा टॅंकर आलेला नाही. या ठिकाणाहून दरारोज पाच ते सहा टॅंकर पाणी केवळ उद्यानांसाठी जात आहे. त्यामुळे रस्त्यांसाठी कोणते पाणी वापरले जाते हे तपासणी करण्याचे काम पथ विभागाकडे आहे. त्याबाबत काही सांगता येणार नाही.
– व्ही. जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा विभाग प्रमुख.सर्व ठेकेदारांना रस्त्यांसाठी पिण्याचे पाणी न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांच्याकडून हमी पत्र घेण्यात आले आहे. अनेक जण टॅंकरद्वारे पाणी आणतात. मात्र, ते महापालिकेचे शुद्ध केलेले सांडपाणी आहे, की इतर खासगी स्रोतांचे हे सांगता येणार नाही. मात्र, कोणत्याही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा वापर आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.
– अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग