वडूज नगरपंचायत प्रभाग क्र. 10 मधील परिस्थिती
वडूज – येथील नगरपंचायत प्रभाग क्रमांक 10 मधील पेडगाव रोडवरील हुतात्मा हायस्कूल लगत असणाऱ्या गटार तुंबल्याने गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
या प्रभागातील नवीन गटाराचे मंजूर असून हे काम गेली वर्षंभरापासून सुरू आहे. संबंधित कामाची मुदत संपूनही संबंधित कॉन्ट्रॅक्टर चालढकल करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या गटाराचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून क्रॉसिंग, झाकणे, पाइप टाकणे आदी कामे करावयाची शिल्लक राहिली असल्याचे नागरिकांचे मत आहे.
तसेच या प्रभागातील उपनगराध्यक्ष हे पाणीपुरवठा व स्वच्छता कमिटीचे सभापती आहेत. गत पंधरा दिवसांपासून या गटारातील पाइपलाइनमध्ये कचरा अडकल्याने गटाराचे पाणी रस्त्यावर साचत आहे.
त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ज्या गटाराच्या पाण्याने रस्त्यावर ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साठत आहे त्या रस्त्यावरून रोज संबंधित सभापती व मुख्याधिकारी यांच्या गाड्या जात आहेत. परंतु त्यांना ते दिसत नाही का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
संबंधित गटाराचे पाणी मेनरोडवर राहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी नगरपंचायत प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी. तसेच त्याची संस्था काळ्या यादीत टाकावी. त्वरित काम न केल्यास स्वच्छता कमिटीचे सभापती व मुख्याधिकारी यांच्या दालनात त्या गटाराचे पाणी ठेवणार आहे.
शहाजीराजे गोडसे नगरसेवक, वडूज