स्मरण:- डॉ. स्टीफन हॉकिंग : दुसरा आईनस्टाइन!

डॉ. मेघश्री दळवी

गेल्या वर्षी 14 मार्चला डॉ. स्टीफन हॉकिंग आपलं जग सोडून गेले. पण त्यांची असामान्य प्रतिभा, त्यांचे सिद्धान्त, त्यांचं लेखन,बुद्धिमत्तेचा प्रचंड आवाका, अतीव जीवनाध्यास, दुर्धर आजारावर केलेली विजयी मात, आणि कायम अबाधित राहिलेली निर्व्याज विनोदबुद्धी या सगळ्यामधून ते अजूनही आपल्यात आहेत. त्यांच्याविषयी…

विश्‍वाची रचना, काळ, ब्लॅक होल्स, समांतर विश्‍व, गणित, भौतिकीच्या सर्व शाखांचं एकत्रीकरण व थिअरी ऑफ एवरीथिंग- एकाच माणसाने विज्ञानाच्या इतक्‍या विविध क्षेत्रांत ठसा उमटवणे दुर्मिळच. म्हणूनच डॉ. स्टीफन हॉकिंग यांना अनेकदा “दुसरा आईनस्टाइन’ असं गौरवलं जातं. लहानपणीच त्यांना अवकाश आणि काळ यांची एवढी जाण होती, की त्यांचे मित्र तेव्हासुद्धा गमतीने त्यांना “आईनस्टाइन’च म्हणायचे.

जीवशास्त्र हॉकिंगना मुळीच आवडायचं नाही. पण आपल्यासारखे इतर ग्रहांवरदेखील सजीव असतील, यावर त्यांचा गाढ विश्‍वास होता. हे एलियन्स (परग्रहवासी) कसे दिसत असतील, कसे वागत असतील, ते पृथ्वीवर आले तर काय हाहाकार उडेल यावर ते अनेकदा भाष्य करत असत. “आपण “एलियन्स’चा शोध घेणं, म्हणजे आपल्या सर्वनाशाला आमंत्रण देणं’ असं त्यांचं ठाम मत होतं. पण त्याचवेळी “आपण सूर्यमालेतल्या इतर ग्रहांवर वस्ती करायला हवी,’ याची त्यांना जाणीव होती. “कधीही होऊ शकणारे उल्का-अशनींचे आघात, रोगांच्या साथी, वाढती लोकसंख्या यांचा पृथ्वीला मोठा धोका आहे. तेव्हा येत्या 100 वर्षांमध्ये आपल्याला नवीन सुयोग्य ग्रह शोधून तिथे मानवी वस्ती करावीच लागेल,’ असा त्यांचा आग्रह होता.

अलीकडे हॉकिंगनी रोबॉटिक्‍स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यात रस घ्यायला सुरुवात केली होती. मोटर न्यूरॉन आजाराने त्रस्त असताना कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून त्यांनी आपलं संशोधन, लेखन सुरू ठेवलं होतं. मात्र, “यंत्रांना बुद्धिमत्ता देताना आपल्या वरचढ असं कोणी तर आपणच निर्माण करत नाही ना,’ अशी भीती ते बोलून दाखवत.

कृष्णविवरे अर्थात “ब्लॅक होल्स’मधून उत्सर्जित होणाऱ्या किरणांमुळे “ब्लॅक होल’चा आकार कमी कमी होत जाईल आणि पुढे दीर्घ काळाने तो पूर्ण नष्ट होऊन जाईल, असा सिद्धान्त हॉकिंग यांनी मांडला. “ब्लॅक होल’ आपल्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे इतर द्रव्य खेचून घेते, म्हणजे तो खरं तर वाढला पाहिजे, असा शास्त्रज्ञांचा विश्‍वास असताना हॉकिंगचा सिद्धांत अगदी उलट आणि धक्कादायक असा होता. या नव्या विचाराने खगोलभौतिकीत मोठी खळबळ माजली होती. Did he prove theoretically?  मात्र या सिद्धांतला आधार देणारी निरीक्षणे मिळाली नसल्याने हॉकिंगना “नोबेल पारितोषिका’पासून वंचित राहावं लागलं.

अनेक क्षेत्रात सखोल संशोधन करूनसुद्धा नोबेल पारितोषिकाने हुलकावणी दिली, तरी कित्येक प्रतिष्ठित पुरस्कार हॉकिंगना मिळाले होते. रॉयल सोसायटीचं सन्माननीय सदस्यत्व, नंतर याच सोसायटीकडून “ह्युजेस मेडल’, “अल्बर्ट आईनस्टाइन ऍवार्ड’, “फंडामेंटल फिजिक्‍स प्राइज’, “कोपली मेडल’, “वूल्फ फाऊंडेशन प्राइज’, पोपकडून “पायस गोल्ड मेडल फॉर सायन्स’, “कमांडर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’चा सन्मान, “कम्पॅनियन ऑफ ऑनर’, अमेरिकेचे “प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’, आणि 13 मानद डॉक्‍टरेट्‌स.

विज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्यामध्ये हॉकिंग नेहमी पुढाकार घेत. त्याबाबतीत त्यांनी कार्ल सेगनचा वारसा चालवला. “ए ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ हे त्यांचं पुस्तक पाच वर्षे बेस्टसेलर होतं. त्याच्या सव्वा कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि 35 भाषांत त्याचा अनुवाद झाला आहे. एखादं विज्ञानविषयक पुस्तक इतक्‍या वाचकांपर्यंत जाणे हे खरं तर दुर्लभ. त्यांची बहुतेक पुस्तकं बेस्टसेलर होती आणि अजूनही आवडीने वाचली जातात. मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या त्यांच्या शेवटच्या पुस्तकात, “ब्रीफ आन्सर्स टू बिग क्वेश्‍चन्स’मध्ये त्यांनी बऱ्याच वैज्ञानिक आणि मानवी अस्तित्वविषयक प्रश्‍नांना हात घातला आहे. हे पुस्तकही बराच काळ चर्चेत होतं. विशेषत: “आपल्या विश्‍वात देवाला मुळीच स्थान नाही,’ हे त्यातलं ठाम विधान होतं.

आपली मुलगी ल्यूसी हिला सोबत घेऊन हॉकिंगनी मुलांसाठी सोप्या भाषेत विज्ञानावर लेखन केलं. “संशोधन प्रबंध लिहा, पण साधे लेखही लिहा,’ असं ते सतत सांगत असत. त्यामुळेच अनेक संशोधक आज आपलं संशोधन वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारे मांडत असतात. आपले विचार लोकांपुढे मांडणं त्यांना आवडायचं. प्रसंगी त्यासाठी ते विनोदाचा आधार घ्यायचे. वेळोवेळी इतर शास्त्रज्ञांबरोबर पैजा लावून “आपण हरलो’ हे जाहीरपणे सांगण्यात त्यांना कधीही कमीपणा वाटायचा नाही.

डिस्कव्हरी चॅनलसाठी आणि ब्रिटनच्या चॅनल फोरसाठी त्यांनी विज्ञानावर खास मालिका केल्या. त्याही चांगल्याच लोकप्रिय झाल्या. “स्टार ट्रेक – द नेक्‍स्ट जनरेशन’ आणि “द बिग बॅंग थिअरी’ या टीव्ही मालिकांमध्ये ते स्वत: असलेले एपिसोड्‌स तुफान गाजले. एखादा शास्त्रज्ञ किती प्रकारे लोकांपर्यंत पोहोचू शकतो याचं डॉ. हॉकिंग हे उत्तम उदाहरण आहे! म्हणूनच आज त्यांना जाऊन एक वर्ष झालं तरी वेगवेगळ्या माध्यमांमधून त्यांचे विचार नक्कीच आपल्यासोबत आहेत. त्यांच्या स्मृतीला वंदन!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)