“नेचर वॉक’ उपक्रमाद्वारे अधिकाऱ्यांचे आश्वासन
पुणे – डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातील जैवविविधता समजून घेत, येथील दुरवस्था आणि विविध कामांची आवश्यकता महापालिका अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. निमित्त होते “सेव्ह सालीम अली पार्क’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे आयोजित “नेचर वॉक’ या उपक्रमाचे. यावेळी अभयारण्याचे विविध समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करण्याबरोबरच येथील कचरा हटविण्याचे आश्वासन घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिले.
प्रस्तावित मेट्रो मार्गामुळे तसेच अतिक्रमणे आणि राडारोडा यामुळे डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्याची दुर्दशा झाली आहे. अभयारण्यात सुमारे 25हून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींचा अधिवास आहे. मात्र, बांधकामांमुळे येथील पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. हा प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे, संस्थेचे धर्मराज पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.