विविधा: डॉ. मोहन आगाशे

माधव विद्वांस

चित्रपट, नाट्य अभिनेते आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन महादेव आगाशे यांचे आज अभीष्टचिंतन. त्यांचा जन्म 23 जुलै 1947 रोजी भोर येथे झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते पुणे येथे आले व त्यांनी बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथून एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले. शिक्षण सुरू असतानाच महाविद्यालयातील नाट्यमंडळात ते काम करू लागले.

आगाशे यांनी वैद्यकीय महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत “प्रार्थना’, “सरहद्द’ या एकांकिकेत भाग घेतला होता व आपल्या अभिनयाची चुणूकही दाखवली होती. त्यावेळी “सरहद्द’चे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केले होते. नाट्य अभिनेते उत्पलदत्त यांच्या ते संपर्कात आले. अभिनय व वैद्यकीय सेवा या दोन्ही गोष्टी त्यांनी सुरू ठेवल्या. आगाशे यांनी पुणे येथील ससून रुग्णालयात काम करून त्यांचे प्रारंभिक वैद्यकीय करिअर सुरू केले. तसेच त्यांनी बी. जे. मेडिकल कॉलेज आणि पुण्यातील ससून रुग्णालयात मनोचिकित्साचे प्राध्यापक म्हणून काम केले. वर्ष 1991 मधे महाराष्ट्र, मानसिक आरोग्य संस्थेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता.

आगाशे हे महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचे संस्थापक संचालक आहेत. त्यांनी क्‍लिनिकल मानसशास्त्र आणि मनोविज्ञान संशोधन क्षेत्रातही काम केले.सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे झालेल्या भारतीय मनोवैज्ञानिक संस्थेच्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेसाठी आयोजन समितीच्या बैठकीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. आगाशे थकवा आणि कमकुवततेच्या सांस्कृतिक विकारांवर भारत-अमेरिका संयुक्‍त प्रकल्पांसाठी प्रमुख अन्वेषक होते.

1993 साली झालेल्या लातूरच्या भूकंपाच्या भावनात्मक आघाताने लोकांच्या मनावर झालेल्या परिणामाचे त्यांनी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेच्या कामाचे नेतृत्व केले होते. वर्ष 1998 मध्ये आगाशे यांनी तयार केलेल्या प्रकल्पानुसार, मानसिक आरोग्य शिक्षण आणि सेवा सुधारण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने मानसिक शिक्षणावर नवीन धोरण तयार केले. तसेच त्यांनी मानसिक आरोग्य शिक्षण आणि सेवेवर महाराष्ट्र सरकारचे सल्लागार म्हणून काम केले आहे.

त्यांनी सई परांजपे यांच्या बालनाट्य संस्थेमधून त्यांच्या मंचावरील कारकिर्दीस सुरुवात केली. “अशी पाखरे येती’ या विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या व जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकात मोहन आगाशे चमकले. त्यानंतर तेंडुलकरांचे “घाशीराम कोतवाल’ या जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकात आगाशेंनी नाना फडणीसांची भूमिका केली व त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. या नाटकात त्यांनी 20 वर्षं काम केले. 1980 साली लंडनमध्ये “घाशीराम कोतवाल’च्या प्रयोगासाठी आगाशे यांनी खूप प्रयत्न केले होते.

अनेक चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. “सामाना’मधील मिल्ट्रिमनची भूमिका रूपेरी पडद्यावरील त्यांची पहिली भूमिका असावी. “जैत रे जैत’मध्ये त्यांनी स्मिता पाटील यांच्याबरोबर नायकाची भूमिका केली होती. सिंहासन, भूमिका, ट्रेन टू पाकिस्तान (हिंदी), जातो कंडू काठमांडू (बंगाली), वळू या चित्रपटांसह सुमारे 100 चित्रपटांत त्यांनी काम केले. एप्रिल 1997 मध्ये त्यांना पुणे येथील, भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे महासंचालक म्हणूनही नियुक्‍त केले गेले होते. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)