डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा

अरुण विश्‍वंभर

 7 नोव्हेंबर 1900 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा हायस्कूलमध्ये (सध्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल) इयत्ता पहिलीमध्ये त्यावेळच्या इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. भिवा रामजी आंबेकर या नावाने शाळेच्या रजिस्टरला 1914 या क्रमांकानुसार प्रवेशाची नोंद आहे. विशेष म्हणजे त्यावेळी आवश्‍यक ते शुल्क भरून हा प्रवेश घेतला होता. भिवा रामजी आंबेडकर अशी मोडी लिपीतील स्वाक्षरीही रजिस्टरला नोंद आहे. 1900 ते 1904 या कालावधीत डॉ. आंबेडकरांचे शिक्षण सातारा हायस्कूल येथे झाले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा साताऱ्यातला नसला तरी त्यांचे बालपण मात्र साताऱ्याच्या मातीला पहावयास व अनुभवयास मिळाले. बाबासाहेबांची खेळण्या बागडण्यातील बालपणातील 8 ते 9 वर्षे साताऱ्यात गेली. त्यावेळी त्यांना भिवा असे म्हणत. आजही त्यांचे त्यावेळचे निवासस्थान साताऱ्यात आहे. त्यांनी जेथे वास्तव्य केले ते सदरबझार परिसरातील नगर भूमापन क्रमांक एक या ठिकाणची ब्रिटिशकालीन वास्तू म्हणजे त्यांचे निवासस्थान होय! महाराष्ट्र शासनाने हे निवासस्थान राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले असून ऊन, पाऊस, वादळवारा याची तमा न बाळगता 100 वर्षानंतरही आंबेडकरांच्या स्मृती जागवत धडधाकटपणे हे निवासस्थान उभे आहे.

डॉ. आंबेडकरांच्या मातोश्री भिमाई आंबेडकर यांचे येथेच निर्वाण झाले. त्यामुळे या निवासस्थानाला वेगळा असा इमोशनल स्पर्श आहे. या निवासस्थानापासून काही अंतरावर भिमाई आंबेडकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जेथे दफन केले त्या ठिकाणी आता कोट्यवधी रुपयांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्यदिव्य अशा स्वरूपात भिमाई आंबेडकरांचे स्मारक उभे राहात आहे. ज्या सातारच्या शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकले, त्या शाळेतील त्यांचा शाळा प्रवेश दिन हाही सध्या देशभर चर्चेत आला आहे. महाराष्ट्र शासनाने डॉ. आंबेडकरांचा हा शाळा प्रवेश दिन महाराष्ट्रभर “विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषित करून तो साजरा करण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे डॉ. आंबेडकरांची शाळासुद्धा देशाचे प्रेरणास्थळ ठरले आहे. एकंदर या संदर्भाने आंबेडकरांचे साताऱ्याशी असणारे ऋणानुबंध ठळकपणे अधोरेखित झाल्याशिवाय राहात नाही.

डॉ.आंबेडकरांचे साताऱ्यातील निवासस्थान 

साधारणतः 1894-95 च्या दरम्यान वडील सुभेदार रामजी आंबेडकर नोकरीनिमित्त साताऱ्यात वास्तव्यास आले. सार्वजनिक विभागातील महत्वाच्या जबाबदाऱ्यांसह निरीक्षक पदाची धुरा रामजी आंबेडकर यांच्यावर होती. ब्रिटिश प्रशासनात कार्यरत असल्याने साताऱ्यातही त्यांच्या अनेकांशी चांगल्या ओळखी निर्माण झाल्या. साताऱ्यातील नगरभूमापन क्रमांक एक येथील ब्रिटीशकालीन वास्तूत ते वास्तव्यास होते. या परिसराला घनदाट झाडाझुडपांची नैसर्गिक मोठी देण लाभल्याने ब्रिटिश अधिकारी या भागात राहात असत. येथील ब्रिटिशकालीन इमारती तसेच चर्च आजही पाहण्यासारखे आहेत.

रामजी आंबेडकर यांनी सुभेदार पदावर ब्रिटिश सैन्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्यामुळे ब्रिटिश प्रशासनात त्यांचा चांगला दरारा होता. शिवाय ब्रिटिश अधिकारी वर्गात त्यांना यथोचित असा मानसन्मानसुद्धा होता. साताऱ्यात सेवेत असताना त्यांनी पत्नी भिमाई आंबेडकर यांच्यासह आपल्या कुटुंबीयांना सदरबझार येथे आणले. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर अर्थात भिवा व त्यांची भावंडे चांगली रमली. याच परिसरात अवघ्या हाकेच्या अंतरावर युनियन स्कूल होते, तेथे लहानगे बाबासाहेब आंबेडकर शिकू लागले. मात्र, त्यांचा इंग्रजी वर्गातला नोंदणीकृत अधिकृत प्रवेश हा राजवाडा येथील सातारा हायस्कूलमध्ये झाला.

त्यामुळे घनदाट झाडी अन्‌ निर्जन रस्ता अशा सदरबझार परिसरातून त्यांना रोज राजवाडा येथे जावे लागत. मात्र, कसलीही भीती न बाळगता बाबासाहेब आंबेडकर सदरबझार येथील निवासस्थानाहून दररोज राजवाडा येथे शाळेसाठी पायी चालत जात असत. याच परिसरात गुजरात, मुंबई संयुक्त प्रांताचे मुख्यमंत्री सर धनजीशा कुपर वास्तव्यास होते. कुपर जेंव्हा ते साताऱ्यात असत त्यावेळी ते नेहमी सदरबझारातील रस्त्यावरून फेरफटका मारायचे. अनेकदा शाळेत पायी जाणारे चुनचुणीत असणारे लहानगे आंबेडकर अर्थात भिवा त्यांच्या दृष्टीस पडत. एकटादुकटा मुलगा शाळेत जातोय याचे त्यांना अप्रूप वाटे. एकदा पावसात रस्ता तुडवत आंबेडकर शाळेकडे जात असताना धनजीशा कुपर यांनी पाहिले आणि त्यांनी स्वतःची छत्री त्या लहान आंबेडकरांना देऊ केली. सदरबझार परिसरात राहणाऱ्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही बाबासाहेब आंबेडकरांची शिकण्याची जिद्द पाहून त्यांचे कौतुकही केले.

वडील रामजी आंबेडकर यांना अधूनमधून मायणी, वडूज, मसूर, वांगी, कराड अशा भागात जावे लागे. चार-पाच दिवस मुक्‍कामही करावा लागे. तेव्हा आपल्या वडिलांचे काम पाहण्याची उत्सुकता आंबेडकरांच्या मनात उचंबळून यायची. अनेकदा त्यांनी ही इच्छा वडिलांकडे बोलूनही दाखविली. त्यामुळे एकदा रामजी आंबेडकरांनी आपल्या कामाच्या ठिकाणी मुलांना भेटावयास बोलावले. तेंव्हा आंबेडकर आपल्या भावंडांसमवेत मसूर-वांगी या ठिकाणी सातारारोड ते मसूर असा रेल्वेने प्रवास करत गेले. पुढे बैलगाडीने मसूरकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. मात्र, बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्‍य आहेत हे बैलगाडी चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने लहानग्या आंबेडकरांना व त्यांच्या भावंडांना अपशब्द करत, अपमानित करत गाडीतून खाली उतरविले. अस्पृश्‍यतेचा हा अपमानजनक प्रसंग आंबेडकरांच्या काळजात खोलवर रुतला. त्यांनी हा प्रसंग वडिलांसमोर कथन केला. ज्या ब्रिटिशकालीन वास्तूत ते राहात होते, तेथून ये-जा करणारे धनजीशा कुपर यांच्यासारखे मोठमोठे लोक आपले कौतुक करतात.

मात्र, बैलगाडी चालक आपल्याशी तिरस्कृत कसा वागला? या प्रश्‍नाने लहानग्या आंबेडकरांचे काळीज पिळवटून गेले. हा प्रसंग त्यांच्या बालमनावर अस्वस्थता निर्माण करू लागला. साताऱ्यात परतल्यानंतर लहानग्या आंबेडकरांना अस्पृश्‍यतेच्या या प्रसंगाने स्वस्थ बसू दिले नाही. या अस्पृश्‍यतेवर प्रहार करण्याची मानसिकता याच निवासस्थानी लहानग्या आंबेडकरांच्या मनात रुजली. त्यामुळे घरी जे कोणी येईल त्यांना हा प्रसंग ते सांगत असत. सध्या हेच ऐतिहासिक निवासस्थान राज्य संरक्षित स्मारक म्हणून नावारूपास आलेले आहे. या स्मारकासाठी 13 नोव्हेंबर 2004 ला चंद्रकांत खंडाईत यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर अनुयायांच्या सहकार्याने आक्रमक आंदोलन झाले होते.

यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. जे. डी. दणाने, पी. डी. साबळे यांच्यासारख्या वयोवृध्द आंदोलकांवर पोलिसांनी हात उगारले. महिलांसह सुमारे दिडशे ते दोनशे कार्यकर्त्यांना अटक झाली. त्यापैकी 74 जणांवर खटले भरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी या आंदोलनाला व्यापक स्वरुप प्राप्त करुन अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. या दरम्यान तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी स्वतः भिमाईभूमीत (साताऱ्यात) येऊन स्मारक होण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे मंत्रालय स्तरावर 13 फेब्रुवारी 2007 ला महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग शासन निर्णय क्रमांक/रा.स.स्मा./2005/प्र.क्र.-60/सा.का. अन्वये शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची अधिसूचना काढली.

यानंतर या स्मारकासाठी तब्बल 10 वर्ष शासन स्तरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती संघर्ष करत आली. चक्री उपोषण, धरणे आंदोलन, आमरण उपोषण, निदर्शने आंदोलन या माध्यमातून स्मारक समितीने स्मारकाचा प्रश्‍न सातत्याने महत्वाचा करत, वेळोवेळी पाठपुरावा केला. शिवाय आंदोलनात्मक पवित्रा घेत शासनाच्या अजेंड्यावर हा प्रश्‍न सतत चर्चेत ठेवला. त्यामुळे हे स्मारक लवकरच खुले होण्याच्या मार्गावर आहे.

7 नोव्हेंबर 1900 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा हायस्कूलमध्ये (सध्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल) इयत्ता पहिलीमध्ये त्यावेळच्या इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. भिवा रामजी आंबेकर या नावाने शाळेच्या रजिस्टरला 1914 या क्रमांकानुसार प्रवेशाची नोंद आहे. विशेष म्हणजे त्यावेळी आवश्‍यक ते शुल्क भरून हा प्रवेश घेतला होता. भिवा रामजी आंबेडकर अशी मोडी लिपीतील स्वाक्षरीही रजिस्टरला नोंद आहे. 1900 ते 1904 या कालावधीत डॉ. आंबेडकरांचे शिक्षण सातारा हायस्कूल येथे झाले. हा ऐतिहासिक दस्तावेज 117 वर्षानंतर आजही आपणास शाळेत पाहावयास मिळतो.

या शाळेतील त्यांची अधिकृत नोंद वा प्रवेश हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. किंबहुना त्यांचा शाळा प्रवेश म्हणजे क्रांतीची अन्‌ युगांतराची चाहूल म्हटली जाते. कारण या शाळेतही त्यांना अस्पृश्‍यतेचे चटके सहन करावे लागले हाते. मात्र, त्यांनी शाळा बंद न करता शाळेत पाऊल टाकणे पसंत केले. त्यांचे शाळेत पाऊल पडलेच नसते; तर ते सुशिक्षीत आणि प्रज्ञावंत होणे शक्‍य नव्हते. महत्त्वाचे म्हणजे जगाच्या नकाशावरील अनेक देशातून आजही ज्याचे उत्स्फूर्त स्वागत केले जाते. ते लोकशाहीप्रधान संविधान त्यांच्या हातून निर्माण झाले नसते. परिणामतः भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मानवी मूल्ये रुजू शकली नसती. याउलट सामाजिक न्याय आणि मानवी मूल्यांची पावला-पावलाला हत्या झाली असती. मग शेकडो वर्षे जातिव्यवस्थेच्या एकदम तळाला गटांगळ्या खाणाऱ्या कोट्यवधी उपेक्षित बहुजनांच्या जीवनावर दुःख – दैन्य – दारिद्‌य्रर्रचे डोंगर कोसळतच राहिले असते. शिवाय अशा पीडित माणसांचे प्राण वाचून त्याला “माणूस’पण मिळणे, ही बाब तर दूरच!

खरेतर, या सातारच्या शाळेतूनच आंबेडकरांनी ज्ञानाच्या अवकाशामध्ये भरारी घेतली आणि प्रज्ञेचे अवघे विश्‍व व्यापून टाकले. शिक्षणाच्या उर्जेमुळेच ते घडले आणि पुढे त्यांचे तेजस्वी आंदोलनही उभे राहिले. त्यामुळे खऱ्या अर्थाने स्वयंविश्‍वासाचा पार चोळामोळा झालेल्या बहुजन – उपेक्षित – वंचित माणसाला “माणूस’पण मिळाले. त्याच्या अंगात दहा हत्तींचे बळ आले. तो ताठ उभा राहिला. त्याच्या धमण्याधमण्यातून स्वयंविश्‍वास अन्‌ स्वयंअस्मितेचे रक्‍त सळसळू लागले. प्रस्थापित व्यवस्थेच्या गुलामगिरीचे साखळदंड त्याच्या पायातून निखळून पडले. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश हा इतिहासाला कूस बदलावयास लावणारी क्रांतिकारी घटना ठरते, हे निर्विवाद सत्य आहे.

वास्तविक या घटनेचा अर्थात डॉ. आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिनाचा शतक महोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर तेव्हापासून छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये या दिवसाचे महत्व विशद करण्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार कार्याला उजाळा देण्याचा दरवर्षी जागर होत असतो. महाराष्ट्राच्या अनेक भागातून असंख्य बांधव या ठिकाणी शाळा प्रवेश दिन सोहळ्यासाठी 7 नोव्हेंबरला उपस्थित राहतात. महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये 7 नोव्हेंबर हा दिवस “विद्यार्थी दिवस’ म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित करावा, यासाठी तब्बल 15 वर्षे जिल्हा प्रशासनापासून ते मंत्रालय प्रशासनापर्यंत अरूण विश्‍वंभर जावळे यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले, त्यामुळे शासनाला अखेर महाराष्ट्रभर विद्यार्थी दिवस साजरा करण्याचा निर्णय घ्यावा लागला, ही वस्तुस्थिती सबंध महाराष्ट्राला ठाऊक आहे.

भिमाई स्मारक साकारू लागले ! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भिमाई आंबेडकर यांचे अल्पशा आजाराने फेब्रुवारी 1896 मध्ये सातारा येथे निर्वाण झाले. सदर बझारातील नगर भूमापन क्रमांक एक या ब्रिटीशकालीन निवासस्थानापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर खेड गावच्या हद्दीत असणाऱ्या स्मशानभूमित भिमाई आंबेडकरांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढे या ठिकाणी दगडाच्या स्वरुपात थडगे उभारले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जेंव्हा जेंव्हा साताऱ्यात यायचे तेंव्हा तेंव्हा त्या थडग्याजवळ जावून ढसढसा रडायचे. साधारणपणे तीन एकर बावीस गुंठे एवढ्या परिसरात सदर स्मशानभूमी पसरल्याने व हायवेलगतच्या मोक्‍याच्या ठिकाणी हे क्षेत्र असल्याने 60 वर्षापासून या जागेवर साताऱ्यातील काही बिल्डरांचा डोळा होता.

शासनाला हाताशी धरून त्यांनी स्मशानभूमिवर प्लॉट पाडून हा भूखंड गिळंकृत करण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यामुळे साहजिकच भिमाईचे थडगे नष्ट होईल की काय? असे चित्र निर्माण झाले आणि या प्रकाराने साताऱ्यातील आंबेडकर अनुयायांच्यातील संताप शिगेला पोहोचला. वातावरण चिघळले, अशा परिस्थितीत ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक पार्थ पोळके आणि पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यासह साताऱ्यातील काही कार्यकर्त्यांनी सन 1980 च्या दशकात या थडग्याच्या ठिकाणी समाधी उभारण्याचा निर्धार केला. परंतु, बिल्डरांच्या दहशतीमुळे प्रशासनाकडून योग्य पध्दतीने समाधी साकारण्यास सहकार्य मिळाले नाही.

उलट तीन एकर बावीस गुंठे क्षेत्रातील एक एक गुंठा क्षेत्र बिल्डर हडप करत राहिले. त्यामुळे साताऱ्यात आंदोलनाचा भडका उडाला आणि अखेरीस 1982 साली भिमाई आंबेडकर समता प्रतिष्ठान स्थापन झाले. पार्थ पोळके यांच्या खांद्यावर या प्रतिष्ठानची सर्व जबाबदारी पडली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनुयायांच्या सहकार्याने शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेऊन तीन एकर बावीस गुंठे परिसरातील काही क्षेत्र खरेदी केले. त्या क्षेत्रात थडग्यावर शेड टाकून त्याला छोटेखानी समाधीचे स्वरुप दिले.

भारताच्या वेगवेगळ्या भागातून अनेक लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्रीला अभिवादन करण्यासाठी साताऱ्यात येत असत. जपान, चीन, मलेशिया, थायलंड आदी देशातील आंबेडकर अनुयायी या ठिकांणी येऊन गेले आहेत. परंतु, भव्य दिव्य स्मारक त्यांना न दिसल्याने त्यांच्याकडून नाराजीचे सूर उमटायचे. जगप्रसिध्द अशा एका महामानवाच्या महामातेचे स्मारक उभे राहू शकत नाही याची खंत भिमाई आंबेडकर समता प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा पार्थ पोळके यांना सतत बोचत राहिली. यासाठी 82 सालापासून स्मारकाच्या उभारणीसाठी ते धडपडत राहिले. 2011 सालापासून या त्यांच्या धडपडीला यश येऊ लागले.

शिवाय प्राथमिक स्वरुपाचे बांधकामही झाले. उर्वरीत बांधकामासाठी शासनाने पावणे तीन कोटी रूपये निधी उपलब्ध करुन दिला. आता पुढील बांधकाम गतीने होण्याची आशादायी चिन्हे निर्माण झाली आहेत. नागपूर येथील दीक्षाभूमी, मुंबई येथील चैत्यभूमी आणि दक्षिण भारतातील सर्वांत मोठे असणारे गुलबर्ग्यातील बुध्दविहार या प्रेरणास्थळांचा अभ्यास करुन भिमाई स्मारकाचे प्रारूप तयार करण्यात आले आहे. हे प्रारूप शासनाने मान्य केल्याने स्मारकाच्या उभारणीला आता कोणताच अडथळा उरला नाही. त्यामुळे मुंबईला ज्या प्रमाणे “चैत्यभूमी’ आणि नागपूरला “दीक्षाभूमी’ उभी राहिली आहे, त्याच पध्दतीने साताऱ्यात आता स्मारकाच्या माध्यमातून “भिमाईभूमी’ आकार घेऊ लागली आहे. ही बाब तमाम भारतीय अनुयायांच्या दृष्टीनेच नव्हे तर जगभरासाठी अत्यंत आनंददायी अशी आहे, हे मात्र निश्‍चित !

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)