महाराष्ट्राच्या रेशीम सल्लागार समितीवर डॉ. ए. डी. जाधव यांची निवड

कोल्हापूर-  महाराष्ट्र शासनातर्फे नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या रेशीम सल्लागार समितीवर येथील शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. ए.डी. जाधव यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे वस्त्रोद्योग सचिव हे समितीचे अध्यक्ष राहणार असून, नागपूरचे रेशीम संचालक सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

डॉ.जाधव रेशीमशास्त्र विषयाचे अध्यापन, संशोधन, प्रसार व प्रचार यासाठी मोलाचे योगदान देत आहेत. क्युबा या देशासाठीही ते रेशीम सल्लागार म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन या समितीवर त्यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यातील सर्वांगीण रेशीम विकासाच्या दृष्टीने धोरण तयार करणे, राज्यातील रेशीम विस्तार व विकासासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू इत्यादी राज्यांच्या धर्तीवर तुती रेशीम उद्योगाची आणि झारखंड, छत्तीसगड राज्यांच्या धर्तीवर टसर रेशीमगाठी विकास कार्यक्रमांचा सर्वंकष कृती आराखडा तयार करणे, धोरण तसेच आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी कामकाजाची दिशा ठरविणे, राज्यात पैठणी, येवला इत्यादी पारंपरिक कौशल्यावर आधारित रेशीम उत्पादनाचा जागतिक पातळीवर प्रचार करून त्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सेरी-टुरिझम प्रकल्प हाती घेण्यासाठी उपाययोजना सुचविणे आदी कामकाज समितीमार्फत करणे अपेक्षित आहे.

सदर समितीने घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने रेशीम संचालक सल्लामसलत करून त्याची विस्तृत पृथक्करण आणि अंमलबजावणी करतील. त्याचप्रमाणे सदर समितीची बैठक दोन महिन्यांतून एकदा आयोजित करण्यात येईल, अशी माहिती रेशीम संचालनालयाच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)