गोव्यातील समुद्रात सेल्फी घेताना डॉक्‍टर तरुणीचा मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

पणजी – गोव्यातील कांदोलिम बीचवरील एका खडकावर उभे राहून सेल्फी घेताना मोठ्या लाटेमुळे पाण्यात बुडालेल्या एका डॉक्‍टर तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर तिच्या मैत्रिणीला वाचवण्यात स्थानिकांना यश मिळाले आहे. युतुकर राम्या कृष्णा (25) असे या तरुणीचे नाव असून ती गोव्यात नोकरी करत होती. मित्रांसोबत ती बीचवर फिरायला आली होती.

राम्या आपल्या काही मित्रमैत्रिणींबरोबर कांदोलिम बीचवर फिरायला आली होती. त्याचवेळी समुद्राला लागून असलेल्या खडकावर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह राम्या व तिच्या एका मैत्रिणीला झाला. यामुळे त्या समुद्रात गेल्या व खडकावर उभ्या राहून सेल्फी काढू लागल्या. भरतीची वेळ असल्याने पाण्याची पातळीही वाढत होती व लाटांचा वेगही वाढला होता. पण राम्या व तिची मैत्रिण सेल्फी घेण्यात मग्न होत्या. त्याचवेळी एक मोठी लाट आली व दोघींना पाण्यात घेऊन गेली.

किनाऱ्यावर उभे असलेल्या लोकांना या दोघी पाण्यात बुडत असल्याचे दिसताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा करत स्थानिकांना मदतीचे आवाहन केले. पण भरतीची वेळ असल्याने पाण्याला वेगही होता. यामुळे राम्या पाण्यात दूर फेकली गेली तर तिच्या मैत्रिणीला वाचवण्यात स्थानिकांना यश मिळाले.

विशेष म्हणजे या दोघी ज्या बीचवर होत्या. तेथे एकही गार्ड नव्हता. गोव्यातील बीचवर सेल्फी घेताना अनेकजणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्य सरकारने येथील 24 ठिकाणं नो सेल्फी झोन म्हमून घोषित केली आहेत. तसेच या बीचवर लाल झेंडेही लावण्यात आले आहेत. पण असे असतानाही पर्यटक अतिउत्साहात समुद्रात जातात. असे येथील गार्डने म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)