डॉक्‍टरांनी धर्म पाळावा (अग्रलेख)

पश्‍चिम बंगाल पुन्हा एकदा चर्चेत आहे. मंगळवारपासून या राज्यातील डॉक्‍टरांनी काम बंद केले आहे. याला नेहमीचेच कारण निमित्त ठरले आहे. राज्यात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या त्याच्या नातलगांनी दोन डॉक्‍टरांना बेदम मारहाण केली. यातील एका डॉक्‍टरचा आता मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. या घटनेमुळे डॉक्‍टरांमध्ये भीती आणि संताप आहे. त्यांनी सर्व सरकारी इस्पितळांत सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करत संप पुकारला आहे. सामान्यत: अशा घटना घडतात तेव्हा सर्वप्रथम आवश्‍यक असतो तो संयम. या घटनेत डॉक्‍टरांकडून आणि त्यांनी ज्या सरकारकडे मागणी केली आहे, त्यांच्याकडूनही परिपक्वता दाखवली जाणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेले नाही. उलट जखम अधिकच चिघळली आहे. त्याचे लोण आता संपूर्ण देशभर पसरले आहे.

डॉक्‍टरांच्या बाजूने राज्यांच्या भिंती तोडून त्यांचे पेशाबांधव मैदानात उतरले आहेत, तर सरकारने याला राजकीय फोडणी दिली आहे. या आंदोलनामागे विरोधी पक्षांचा हात असल्याचा मठ्ठ आरोप सरकारने केला आहे. यात प. बंगालसोबतच देशातील बहुतेक राज्यातील रुग्ण व विशेषत: गरीब रुग्ण विनाकारण भरडले गेले आहेत. मात्र याचे त्यांना वैषम्य नाही. राज्यकर्त्यांनी त्यांचा धर्म पाळायचाच असतो. त्यांनी कोणताही धर्म-जात-वर्ग न पाहता आणि पक्षपात न करता सगळ्यांना समान न्याय द्यायचा असतो. त्याकरता अगोदर त्यांच्यात पेशन्स असणे आवश्‍यक असते. त्याकरता उथळपणाचा त्याग करणे महत्त्वाचे असते. ते केले तरच विषयाच्या मुळाशी जाता येते आणि समस्येचे गांभीर्य समजते. त्यानंतर त्यावर तोडगा काढता येतो. मात्र प. बंगालचा गेल्या दशकभरातील प्रवास पाहता, तेथे राज्यशकट ज्यांच्या हातात आहे, तेच सतत भांडणाच्या पवित्र्यात असतात.

आपल्या राज्यातील ज्या काही नैसर्गिक आणि अनैसर्गिक समस्या आहेत, त्यामागे विरोधकांचा हात असल्याचा त्यांना कायम संशय असतो. आताही त्या संशयाने जे बोलू नये व करू नये, तेच सरकारकडून झाले आहे. विरोधकांच्या नावे शंख करून ते मोकळे झाले आहेत. वास्तविक अशा वेळी आग पसरू नये म्हणून वेळीच विझवण्याचा प्रयत्न असायला हवा. त्यात उलट पेट्रोल ओतण्याचेच काम केले गेले. हल्लेखोर आरोपींना पकडण्याबाबत सरकार ढिम्मच आहे. मात्र डॉक्‍टरांनाच दमबाजी केली जातेय. डॉक्‍टरांवर हल्ल्याचा प्रकार पहिल्यांदाच झाला आहे, असे नाही. देशभरात विविध राज्यांत अशा असंख्य घटना घडल्या आहेत.

दोष असो वा नसो अनेक डॉक्‍टरांना रुग्णाच्या नातलगांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. त्यावेळपुरता अशा घटनांचा गदारोळ होतो. नंतर वातावरण पुन्हा पूर्वपदावर येते. पण दरम्यानचा जो काळ असतो. तो अत्यंत महत्त्वाचा असतो. तो काही आठवडे आणि महिन्यांचा किंवा वर्षांचा नसतो, तर अगदी काही तासांचा असतो. अंदोलनाच्या फेऱ्यात जे कमनशिबी सापडतात त्यांच्या वेदना त्यांच्या रुग्णाला होणाऱ्या वेदनांपेक्षाही मोठ्या असतात. आर्थिक विषमतेमुळे गरिबांना प्रत्येक गोष्ट झगडूनच मिळत असते. पोलीस ठाणे, न्यायालय, सरकारी कार्यालये इतकेच काय, देवाच्या मंदिराची दारेही त्याच्यासाठी अगदी त्याचा अंत पाहून सगळ्यात शेवटी उघडतात. त्याच्या गरिबीची ही शिक्षा असते. श्रीमंताच्या बाबतीत कदाचित वेगळी नियमावली असावी.

अगदी मध्य रात्रीनंतरही त्यांना सगळीकडे मुक्‍त प्रवेश दिला जातो. हा आपल्याला विकत घेऊ शकतो ना, किंवा याची आपल्याला विकत घ्यायची ताकद आहे ना, एवढा विचार करून त्यांना दारे खुली केली जातात. गरिबांवर फक्‍त हातच उगारले जातात. कोणत्या शतकात आपण जगतो आहोत, हा विषय येथे गैरलागू. हे आपले वास्तव आहे. पैशाचा खेळ निर्णायक असल्यावर यंत्रणा नासायला वेळ लागत नाही. अशा वर्तमानात जेव्हा झगडत कोणी एखाद्या ठिकाणी पाहोचतो, तेव्हा त्याला काही चांगले होणार अशी आस असते. मात्र त्याच्या विपरीत काही झाले की त्याचा संयम संपतो आणि तो नको ते धाडस करायला उद्युक्त होतो.

आजही रुग्णालये कमी आणि रुग्ण जास्त आहेत. जेथे रुग्णालये आहेत, तेथे डॉक्‍टर नाही. डॉक्‍टर आहेत, तेथे त्यांना सहकारी नाही. जेथे हे दोघेही आहेत, तेथे रुग्णांसाठी पलंग नाहीत. औषधांचा तुटवडा पाचवीला पुजलेला. जी औषधे आहेत, ती एक्‍स्पायर झालेली असतात. ज्या काळात ज्या औषधांची हमखास गरज असते ती नेमकी त्याचवेळी कधीच उपलब्ध नसतात. सरकारी रुग्णालयांतील या गलथानपणाला डॉक्‍टर निश्‍चितच जबाबदार नसतात. काही कमाईखोर वृत्तीचे अपवाद सोडले तर इतर डॉक्‍टर आपल्या पेशाशी प्रातारणा न करण्याचाच प्रयत्न करत असतात. मात्र ज्या गोष्टी त्यांच्या हातात नसतात, त्याबद्दल निर्माण झालेल्या संतापाचे त्यांना बळी ठरावे लागते. जे आता प. बंगालमध्ये झाले. डॉक्‍टरांवर होणाऱ्या हल्ल्यांमागे ही पार्श्‍वभूमी आहे. तीही समजून घेतली पाहिजे.

हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्‍टरांच्या सहकाऱ्यांची आर्त हाक सरकारच्या कानी पडण्या अगोदरच खरेतर सरकारने त्यांना आश्‍वस्त करायला हवे होते. येथे भलताच प्रकार झाला. जे लोक तेथे सेवा देत आहेत, त्यांनाच बाहेरचे ठरवले गेले आणि रुग्णालयातील निवासाची जागा सोडण्यासाठी अंतिम मुदत दिली गेली. त्यामुळे संघर्ष पेटला. आतापर्यंत पन्नासच्या आसपास डॉक्‍टरांनी राजीनामे दिले आहेत. महाराष्ट्रासह सर्वच राज्यांतील डॉक्‍टरांनी कुठे काळ्या फिती बांधून तर कुठे काम बंद ठेवून बंगालमधील डॉक्‍टरांना पाठिंबा दिला.

अन्य राज्यांमध्येही रुग्णसेवा विस्कळीत झाल्याचे चित्र शुक्रवारी होते. हे टाळता आले असते. निषेध नोंदवून काम करण्याला कोणाचा आक्षेप नाही. मात्र कामच थांबवणे व ज्यांचा या संपूर्ण संघर्षाशी दुरान्वयेही संबंध नाही, त्यांचे हाल करणे कोणत्याच धर्मात बसत नाही. मानवतेच्या तर मुळीच नाही. मानवतेच्या या धर्मात डॉक्‍टरांना सर्वोच्च स्थान आहे. रुग्णांकडून त्यांना सदैव मान-सन्मान- प्रतिष्ठा लाभते. अशा स्थितीत रुग्ण त्यांच्याकडे ज्या अपेक्षेने पाहतो, त्याच्या कसोटीवर खरे उतरण्याची मोठी जबाबदारीही त्यांच्यावर असते. ती आपला धर्म पाळत त्यांनी पार पाडावी. त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांचे कोणीही समर्थन करूच शकत नाही. मात्र दुसऱ्याच्या दोषाकरता तिसऱ्याच्या सांगण्यावरून चौथ्याला शिक्षा देण्याचा धर्म कोणता आहे, याचाही त्यांनी विचार करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)