नगराध्यक्षांमुळे सात कोटीचा निधी परत घालवायचा का?

अमोल मोहिते : कामांची यादी निश्‍चित न केल्यास नविआ आंदोलन छेडणार

सातारा-
सातारा नगर पालिकेचा कारभार रामभरोसे सुरु आहे.निष्क्रीय नगराध्यक्षांमुळे सातारा शहराचा विकास खुंटला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून सातारा पालिकेला सुमारे 7 कोटी निधी मिळणार आहे मात्र, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी कामांची यादी निश्‍चित केली नाही. त्यामुळे हा सात कोटी निधी परत जाणार आहे. यासाठी नगराध्यक्षांनी तातडीने कामांची यादी मुख्याधिकाऱ्यांना द्यावी, अन्यथा मंगळवार दि. 20 रोजी नगरविकास आघाडी आंदोलन छेडेल, असा इशारा नविआचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांनी पत्रकाव्दारे दिला.

पत्रकात मोहिते यांनी म्हटले आहे , दि. 7 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदर योजनेमधील कामे निश्‍चित करण्याचा अधिकार नगराध्यक्षांना देण्यात आला आहे. त्यानुसार दलितवस्ती सुधार योजनेमधून 4.25 कोटी, नगरोत्थानमधून किमान 1 कोटी, रस्ते अनुदानमधून 3 कोटी आणि इतर योजनांमधुन किमान 1 कोटी निधी मिळणे अपेक्षित आहे.दि. 15 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या बैठकीत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर दि. 12 सप्टेबर 2018 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा पालिकेने एका आठवड्याच्या आत कामांचा प्रस्ताव सादर करावा.

प्रस्ताव सादर न केल्यास सातारा पालिकेसाठीचा निधी जिल्ह्यातील दुसऱ्या पालिकेला दिला जाईल, अशी सक्‍त ताकिद सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिली होती. पण, नगराध्यक्षांना चेक, आणि कमिशन यातून फुरसत मिळत नसल्याने त्यांना आजपर्यंत कामांची यादी निश्‍चित करता आली नाही आणि हा निधी सातारा पालिकेला मिळण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.

शहराच्या विकास कामांची यादी देण्यास नकार देणाऱ्या या नगराध्यक्षांच्या मनमानीला पालिका प्रशासनातील अधिकारीही वैतागले आहेत. त्यामुळेच सदर कामांची यादी तातडीने देवून सात कोटीचा निधी पालिकेला मिळावा, अशी विनंतीवजा मागणी मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दि. 6 ऑक्‍टोबर 2018 रोजी नगराध्यक्षांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याला एक महिना उलटून गेला तरी, उत्तर दिले नाही.

दोन वार्डात पाहणी दौरा करणाऱ्या नगराध्यक्षांना 7 कोटी निधीचे वावडे का? सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांबरोबरच दस्तुरखुद्द नेत्यांना हात टेकायला लावणाऱ्या या नगराध्यक्षांमुळे सातारा शहराचे आणि सातारकरांचे नुकसान होत आहे. नगराध्यक्षांनी येत्या सोमवारपर्यंत सदर विकासकामांची यादी निश्‍चित करावी आणि पुढील शासकीय सोपस्कार करण्यासाठी ती मुख्याधिकाऱ्यांकडे द्यावी अन्यथा मंगळवारी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा अमोल मोहिते यांनी दिला आहे. तसेच शहराच्या विकासासाठी मिळणारा निधी तुमच्यामुळे परत गेल्यास तुमची धडगत नाही, असा इशाराही मोहिती यांनी सौ. कदम यांना पत्रकाद्वारे दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)