काय रे अलिबागवरून आला आहेस का? या वाक्यावर बंदी घाला

या उपहासात्मक वाक्‍याला विरोध करणारी याचिका हायकोर्टात

मुंबई – एखाद्या वाक्‍याचा एखाद्या व्यक्तीला हिणवण्यासाठी सर्रास वापर केला जात असताना एखाद्या व्यक्तीला का रे अलिबागहून आलास का? अस हिणवून अलिबागवासीयांचा अवमान केला जात आहे. असा आरोप करून या वाक्‍याविरोधात बीएफसी आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याने काहीतरी ठोस पावले उचलावित अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अलिबागचे रहिवासी असलेल्या राजेंद्र मधूकर ठाकूर यांच्या वतीने अॅड. रघुराज देशपांडे यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर मुख्य न्या. नरेश पाटील आणि न्या. नितीन जमादार यांच्या खंडपीठासमोर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे.

सिनेमा, नाटक, टिव्ही वरच्या मालिका मधून प्रचलित झालेले, काय रे अलिबागवरून आला आहेस का? हे वाक्‍य तू मुर्ख आहेस का? या आशयाने वापरले जात असल्याने उगाच विनाकारण अलिबागसारख्या समृद्ध आणि महाराष्ट्र एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ असलेल्या ठिकाणाची बदनामी करणारे आहे. असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तसेच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात त्यांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी अलिबाग वसवले होतं. निसर्गरम्य समुद्र किनारे, सागरी किल्ले, देवस्थानं, अभयारण्य यांनी समृद्ध असलेला रायगड जिल्ह्यातील हा भाग मुंबई आणि पुणेकरांसाठीचं वीक एण्डसाठी सर्वात आवडते ठिकाण आहे. त्याचबरोबर नव्याने विकसित करण्यात आलेले सरकारी आणि खाजगी उद्योगधंदे आणि प्रकल्प हे या ठिकाणाचे महत्त्व अधोरेखित करतात असा दावा करताना सेंसॉर बोर्डाला कोणत्याही नव्या सिनेमा, जाहिरात यांना प्रमाणपत्र जारी करताना अश्‍याप्रकारचा उल्लेख काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)