कॉम्प्युटर नको अगोदर शौचालये बांधा 

जि.प.सदस्यांनी केले शिक्षणविभागाचे पोस्टमार्टम:शाळांच्या दूरवस्थेवर टीका
सातारा- जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतींची दुर्वस्था, शौचालयांचा अभाव, पिण्याचे पाणी, शिक्षकांची संख्या व बदल्या तसेच कॉम्प्युटर खरेदी विषयांवरून जि.प.सदस्यांनी शुक्रवारी शिक्षण विभागाच्या कामकाजाचे पोस्टमार्टम केले. शाळांमध्ये कॉम्प्युटर देण्याअगोदर शौचालये व पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या, अशी मागणी सदस्यांनी केली. दरम्यान, शौचालये दुरूस्ती व बांधणीसाठी लवकरात लवकर नियोजन समितीमधून निधीची तरतूद करण्यात येईल असे अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर यांनी सांगितले.
सर्वसाधारण सभेचे आयोजन शुक्रवारी छ.शिवाजीमहाराज सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी जि.प.अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड, कृषी सभापती मनोज पवार, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, प्र.मुख्यकार्यकारी अधिकारी नितीन थाडे, अति.मुख्यकार्यकारी सुहास धोत्रे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांच्यासह विविध खातेप्रमुख उपस्थित होते.
दरम्यान, विषय पत्रिकेवरील शाळांमध्ये संगणक खरेदीसाठी 1 कोटी रूपयांची तरतूद करण्याच्या विषयाला मंजूरी देण्यात आल्यानंतर धैर्यशील अनपट यांनी फलटण तालुक्‍यातील सासवड जिल्हापरिषद गटात असलेल्या मलवडी गावातील प्राथमिक शाळेला शौचालय उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच मंगेश धुमाळ यांनी अनेक ठीकाणी शाळांना आयएसओ मानंकन प्राप्त करण्यासाठी दुर्वस्था होवूनही शौचालयाची स्थिती चांगली असल्याचे कागदावर दाखविले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांचे सर्वेक्षण करणे आवश्‍यक असल्याची मागणी धुमाळ यांनी केली.
तर अरूण गोरे यांनी बिदाल गटातील शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती एका ठीकाणी असताना दुसऱ्या शाळेत अध्यापनासाठी पाठविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच कराड तालुक्‍यात गटशिक्षण अधिकारी पद रिक्त असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित करताच सुरेंद्र गुदगे यांनी जिल्ह्यातील 5 तालुक्‍यांमध्ये गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त असल्याचे सांगितले तसेच त्यापदाचा कार्यभार समकक्ष अधिकाऱ्यांकडे सोपविणे आवश्‍यक असताना कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला असल्याचे सांगितले. त्यावर अध्यक्ष संजीवराजे यांनी गटशिक्षण अधिकारी पदे रिक्त भरण्याची मागणी शासनाकडे केली असल्याचे सांगताच भाजप सदस्य दिपक पवार यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती आम्हाला ही देत जावा जेणे करून पाठपुरावा करता येईल असे सांगताच संजीवराजेंनी त्याबाबतची माहिती देण्यात येईल असे सांगितले. तसेच यावेळी कराड तालुक्‍यातील रेठरे बु. शाळेमध्ये मुख्याध्यापक नसून तात्काळ नियुक्ती करण्याची मागणी सदस्यांनी केली.
दिपक पवार यांनी मागील वेळी खरेदी केलेले अनेक कॉम्प्युटर निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला तर यावेळी 1 कोटी तरतूद केली आहे. या रक्कमेत किती व कशापध्दतीने खरेदी होणार असल्याची विचारणा केली. त्यावर उपमुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी शासनाने तयार केलेल्या पोर्टलच्या माध्यमातून खरेदी होणार असल्याचे सांगितले. तर प्रा.डॉ.शिवाजीराव चव्हाण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या प्रतापसिांह हायस्कूलची दुर्वस्था झाली असून त्या ठीकाणी तज्ञ मुख्याध्यापक नेमण्याची मागणी यावेळी केली. तसेच पटसंख्या कमी असून देखील अनेक जि.प.प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अधिक असल्याचे चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
शिक्षक सोडण्याची प्रक्रिया संशयास्पद 
दरम्यान, परजिल्ह्यात बदली झालेल्या शिक्षकांना सोडताना अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा मुद्दा सुरेंद्र गुदगे यांनी उपस्थित केला. शिक्षकांना एक एक करून न सोडता एकत्रित सोडावे व त्याची माहिती पदाधिकारी व सदस्यांनी दिली गेली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसेच मागील वर्षी परजिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्या झाल्या मात्र तेथील जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी त्या शिक्षकांना सोडले नाही. त्या जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या बाबतीत आपण काय कार्यवाही केली अशी विचारणा केली. त्यावर प्रभारी शिक्षणाधिकारी सत्यजीत बडे यांना उत्तर देता आले नाही मात्र जेवढ्या संख्येने आपल्या जिल्ह्यात शिक्षक रूजू होत होते त्याच तुलनेत येथील शिक्षकांना परजिल्ह्यात नियुक्तीस सोडण्यात आले असल्याचे बडे यांनी सांगितले.
 मानकुमरेंची जबाबदारी अधिक 
जिल्हा परिषद मुद्रणालयाच्या प्रेसचा मुद्दा यावेळी चर्चेला घेण्यात आला. मुद्रणालयाची आर्थिक उलाढाल ठीक असून नवीन प्रेस मशीन घेण्याबाबत नुकतीच एक बैठक घेण्यात आली असल्याचे संजीवराजे यांनी असल्याचे सांगितले. त्यावर सुरेंद्र गुदगे यांनी जिल्हा परिषदेची प्रेस असताना बाहेरून छपाई करून आणणाऱ्या विभागांची माहिती विचारली. त्यावर शिक्षण सभापती राजेश पवार यांनी कागदाचा तुटवडा असल्याने बाहेरून छपाई करावी लागली असल्याचे सांगितले. मात्र, गुदगे यांनी मुद्रणालयात कार्यरत 11 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत करण्याचा निर्णय उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी घेतला आहे. त्यामुळे मुद्रणालयाची आर्थिक स्थिती ठीक राहण्याची जबाबदारी मानकुमरे यांची अधिक असल्याचे सांगितले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)