उन्हात फिरणे नको रे बाप्पा! कार्यकर्त्यांचा कार्यालयातच रेंगाळण्याकडे कल

पुणे – एप्रिलमध्येच पारा 40 अंशापेक्षा वर गेल्याने अंगाची काहिली होत आहे. त्यातून निवडणूक प्रचार म्हणजे अंगावर काटा आणणारा विषय. कार्यकर्ताच काय तर उमेदवारांनीही या उन्हाची धास्ती घेतली आहे. त्यामुळे उन्हात फिरणे नको रे बाप्पा असे म्हणत नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही निवडणूक कार्यालयातच ठिय्या मारण्याचा निर्णय घेतला आहे.

साहजिकच संपूर्ण शहर म्हणजे सगळेच मतदार संघ पालथे घालावे लागणार असल्याने उमेदवारांना उघड्या जीपशिवाय पर्याय नाही. त्यातूनही त्या जिप्सींना शेड नाही, त्यामुळे उन्हाचा तडाखा थेट बसतो. त्यामुळेच सकाळी उठून उन्हाच्या आत प्रचार फेरीला सुरूवात करायची असा घाट उमेदवारांनी घातला आहे. त्यातून ऊन वाढल्यानंतर कार्यकर्ते प्रचार फेरीत येतीलच असे नाही, अशापरिस्थितीत शक्ती प्रदर्शन करणार कसे. त्यामुळे 12 वाजायच्या आतच प्रचार फेरी उरकून घेण्याकडे उमेदवारांचा कल दिसू लागला आहे.

उमेदवारांनीही दुपारचा एक नंतरचा वेळ “इनडोअर’ मेळावे घेण्यासाठी वापरण्याला सुरूवात केली आहे. बाहेर फिरणे अशक्‍य असल्याने मेळाव्यांचा फंडा थोडाफार पचनी पडल्याचे दिसून येत आहे. व्यापारी मेळावे आणि अन्य मेळवे, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याच्या बैठका, रणनिती आखण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठका असा त्याला रंग दिला जात आहे.

संध्याकाळी पाच नंतर मात्र काही भागात या प्रचार फेरी काढण्यात येत आहे. केवळ या उन्हासाठीच केंद्रातून आणि राज्यातून मंत्र्यांना बोलावणे आणि त्यांच्या सभांसाठी आधी गर्दी करणे, कार्यकर्त्यांना सभेच्या ठिकाणी आणणेही प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांना शक्‍य होत नाही. त्यामुळे त्यांनीही हतबलता दर्शवली आहे. सकाळी निघालेल्या प्रचारफेरीदरम्यान सरबत, थंडपेय वाटण्यापुरतीच सेवा देऊ असे स्वच्छच सांगण्यात आल्याने, “लोकसभा निवडणुकीचा फील यंदा नाहीच, आमच्यावेळी कशी निवडणूक व्हायची’ असे किस्सेच फक्त निवडणूक कार्यालयांमधून फावल्या वेळेत ऐकायला येत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)