गर्भनिरोधक गोळ्या स्वतः घेऊ नका

डॉ. विनिता साळवी

डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय सहज मिळणाऱ्या ईसीपी (इमर्जन्सी कॉंट्रासेप्टिव्ह पिल्स) तसंच गर्भनिरोधक खायच्या गोळ्या (ओरल पिल्स) अज्ञानापोटी कशाही घेतल्या जातात. त्याचा परिणाम होतो हार्मोन्सवर. एकदा का हार्मोन्सवर परिणाम झाला की, गर्भधारणा, मासिक पाळीवरही त्याचा परिणाम होऊ लागतो.

रेश्‍मा आणि राकेश… दोघंही एकमेकांना गेल्या चार वर्षापासून ओळखतात. येत्या एक-दोन वर्षात ते लग्न करणार आहेत. त्यादिवशी त्या दोघांची बाइक एका केमिस्ट शॉपजवळ थांबली. राकेशने रेश्‍माच्या हातात गर्भनिरोधक खायच्या गोळ्यांचं पाकीट ठेवत म्हटलं, “अगं उगाच रिस्क कशाला?’ दोघंही काळजी घेतात ते योग्य होतं. पण डॉक्‍टरांच्या सल्लयाशिवाय राकेशने रेश्‍माच्या हातात गोळ्यांचं पाकीट ठेवलं, ते काही पटलं नाही!!! डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या या गर्भनिरोधक खायच्या गोळ्यांचे शरीरावर होणारे परिणाम वाईट असतात; जसं की, मासिक पाळीच्या वेळी होणारे त्रास, मासिकपाळी दरम्यान अतिरक्‍तस्राव होणं, संप्रेरकांमुळे होणारे बदल हे परिणाम महत्त्वाचे आहेत.

गर्भनिरोधक खायच्या गोळ्या (ओरल पिल्स) बाजारात उपलब्ध व्हायला लागल्यामुळे प्लानिंगशिवाय गर्भधारणा, गर्भपात या घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे. खासकरून ईसीपीमुळे (इमर्जन्सी कॉंट्रासेप्टिव्ह पिल्स) सुनियोजित आईपणाचं (प्लान्ड मदरहूड) स्वातंत्रय स्त्रीला मिळालं. गरज पडल्यास कधीही प्रिस्क्रीप्शनशिवाय या गोळ्या ताबडतोब उपलब्ध होतात. ही झाली ओरल पिल्सची सकारात्मक बाजू. कुठल्याही गोष्टीची जशी चांगली बाजू असते, तशी वाईटही असते. 
 
डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्या गेलेल्या ओरल पिल्सचे दुष्परिणाम भयंकर आहेत. अनेक सर्वेक्षणांतून समोर आलेल्या गोष्टी असं सांगतात की, ईसीपी कुठल्याही केमिस्टमध्ये डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) सहज उपलब्ध होत असल्यामुळे (ऑटीसी- ओव्हर-द-काउंटर) कमी वयाच्या तरुण-तरुणींमध्ये असुरक्षित शरीरसंबंधांचं प्रमाण वाढत आहे. अजाणतेपणामुळे सेक्‍सच्या आहारी गेलेल्या तरुणाईला गुप्तरोगांची लागण होते. आणखी एका सर्वेक्षणातून असं स्पष्ट झालंय की, गेल्या तीन वर्षाच्या आत ईसीपीची विक्री कंडोमच्या तुलनेत वाढली आहे. या सर्वेक्षणावर स्त्रीरोगतज्ज्ञ (गायनॅकोलॉजिस्ट) आणि कामविज्ञान तज्ज्ञ (सेक्‍सोलॉजिट) यांनी चिंता व्यक्ती केली आहे. 


काय आहेत ईसीपी? 

असुरक्षित शरीरसंबंधाच्या वेळी चुकून गर्भधारणा होण्याची शक्‍यता जास्त असते. अशा वेळी तसंच अनियोजित गर्भधारणा रोखण्यासाठी ईसीपीचा उपयोग केला जातो. याते संप्रेरकं (हार्मोन्स) असतात. गोळ्यांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ही संप्रेरकं असतात. ही संप्रेरकं नको असलेली गर्भधारणा रोखतात. मात्र या गोळ्या संबंधांनंतर 12 ते 24 तासांच्या आत घेतल्यास गर्भधारणेची शक्‍यता 95 टक्‍क्‍यांनी कमी होते. तसंच संबंधांनंतर 24 ते 72 तासांच्या आता घेतल्यास गोळ्यांचा परिणाम हा फक्‍त आणि फक्‍त 58 टक्के शिल्लक राहतो. 

किरकोळ दुष्परिणाम : 

या गोळ्यांमध्ये स्त्री संप्रेरकांची (फिमेल
हार्मोन्स) टक्केवारी जास्त असते. त्यामुळे या गोळ्या घेतल्यानंतर मासिक पाळी तारखेपेक्षा लवकर येते किंवा पुढे ढकलली जाते. मासिक पाळीच्या दरम्यान प्रमाणापेक्षा जास्त रक्‍तस्राव होतो. तसंच थकवा येणं, डोकंदुखी, घाबरल्यासारखं होणं, स्तनांमध्ये दुखणं याही समस्या जाणवतात. काही स्त्रियांना उचक्‍या लागणं, उलट्या होणं हेही त्रास होतात. या गोळ्या घेतल्यानंतर जास्त करून स्त्रियांची मासिक पाळी तारखेपेक्षा आठवडाभर आधी येते. तसंच ईसीपी घेतल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत मासिक पाळी न आल्यास स्त्रीला दिवस जाऊ शकतात. 

नियमित घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या : 

नको असलेलं आईपण टाळण्यासाठी गर्भनिरोधक खायच्या गोळ्या नियमित घेणाऱ्याही स्त्रियांची संख्या जास्त आहे. या गोळ्या सुरक्षित आहेत, यावर त्यांचा विश्‍वास असतो. ईसीपीच्या तुलनेत गर्भनिरोधक खायच्या गोळया या अधिक सुरक्षित असतात. मात्र, या गोळ्या घेताना तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. माझी मैत्रीण ही गोळी घेते म्हणून मीही घेते किंवा माझी काकीही गोळी घ्यायची म्हणून मीही गोळी घेते, अशा एकमेकींच्या अनुभवावरून जाहिरातींना भुलून गर्भनिरोधक खायच्या गोळ्या घेणाऱ्यांच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होत आहे. 
 
मात्र हे कधी कधी जीवावर बेतू शकतं. जसं की स्त्रियांना यकृताचे आजार असतील, मायग्रेनची समस्या असेल, रक्तदाबाचा त्रास असेल, मधुमेहाचा त्रास किंवा इतर कोणत्याही आजारपणाचं औषध चालू असेल.. अशा परिस्थितीत जर नियमित स्वरूपात गर्भनिरोधक खायच्या गोळ्या घेणं सुरू केलं तर ते जीवावर बेतू शकतं.

मनाने निर्णय घेऊ नका! 

तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय नियमित स्वरूपात गर्भनिरोधक खायच्या गोळ्या तसंच ईसीपी घेणं आणि मध्येच खाणं सुरू करणं म्हणजे आपलं शरीर आणि संप्रेरकांशी जणू खेळणंच आहे. आपल्या मैत्रिणीला एखादी गोळी चालते किंवा माझी मैत्रीण एखादी गोळी घेते म्हणजे ती मलाही चालेल असा विचार करून गोळ्या घ्यायला सुरुवात करणं योग्य नाही. वेगवेगळ्या गोळया या निरनिराळया रसायनांच्या संयोगाने तयार केल्या जातात. प्रत्येकाची शरीर प्रकृती ही निराळी असते. 
 
मात्र ईसीपी पिल्स तसंच नियमित स्वरूपात घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या या डॉक्‍टरांच्या सल्ल्‌याने घेतल्यास डॉक्‍टर नीट तपासून शरीररचनेनुसार देतात. गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने वजन वाढतं, हार्मोन्सची संख्या बिघडते, असं वाटतं. या गोळयांमुळे कॅन्सर होतो, अशीही काही जणींची समजूत असते. पण आताच्या गर्भनिरोधक गोळ्या या पूर्वीपेक्षा हेवी डोसच्या नसतात. त्यामुळे अशा शंकाकुशंका मनात येण्याचं कारण नाही. ईसीपी या प्रकारात मोडणाऱ्या गोळ्यांविषयी फारसी माहिती नसते. 

अनेकींना ईसीपी या प्रकारात मोडणाऱ्या गोळ्या या नियमित स्वरूपातील गर्भनिरोधक खायच्या गोळयांप्रमाणे वाटतात. नेमका हाच गैरसमज जीवावर बेततो. संतती प्रतिबंधक गोळ्यांचे इतरही अनेक फायदे आहेत. पाळी नियमित होते. पाळी सुरू होण्याआधीच्या तक्रारी आणि दुखणं कमी होतं. पाळीच्या दिवसात अंगावर कमी जाणं, कमी रक्तस्त्रावामुळे पंडुरोग होण्याची शक्‍यता घटते. गर्भ असाधारण ठिकाणी रुजणं, स्तनांत स्त्रीबीज कोषात गाठी होणं, गर्भशयाच्या आतल्या अस्तराचा कर्करोग, ओटीपोटात जंतू संसर्ग होणं इत्यादी अनेक रोगांपासून संततीप्रतिबंधक गोळया स्त्रियांचा बचाव करतात. संतति-प्रतिबंधक गोळयांमुळे वजन वाढण्याची शक्‍यता नगण्य असते. म्हणजेच पूर्वीचे गैरसमज आता निकालात निघाले आहेत. 

शिवाय कॅन्सर व्हायची भीती नसते. गोळ्या थांबवल्यास गर्भधारणा व्हायची क्षमता परत प्राप्त होते. तेव्हा वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य त्या संततीप्रतिबंध गोळ्या जरूर घ्यायला हव्यात.
 
गंभीर दुष्परिणाम 

-Ads-

  • ईसीपी गोळ्या वारंवार घेणाऱ्या व्यक्‍तीला असुरक्षित शरीरसंबंधातून गुप्तरोग, एड्‌ससारख्या रोगांची लागण चटकन होते. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.
  • या गोळ्या डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळत असल्यामुळे कमी वयाच्या तरुण-तरुणी लवकर सेक्‍शुअली ऍक्‍टिव्ह होतात. ईसीपी गोळ्या नियमित घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांप्रमाणे घेण्याची त्यांना सवय लागते.
  •  काही औषधं अशी असतात की, जी ईसीपीच्या परिणामांची तीव्रता कमी करतात. अशा गोळ्यांमुळे एकतर ऍलर्जी तरी होते किंवा गरोदर राहण्याची शक्‍यता तरी वाढते.
  • या गोळ्यांमुळे इक्‍टोपीक प्रेग्नन्सी म्हणजे गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा होते. यात गर्भाची वाढ फॅलोपिअन टयुबमध्ये होते. अशा स्थितीत गर्भपात करणं हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो. नाहीतर फॅलोपिअन टयुब फुटून स्त्रीच्या जीवावर बेतू शकतं.
What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)