कंबर व पाठदुखीकडे नको दुर्लक्ष (भाग १)

सुजाता टिकेकर 

पाठदुखी आणि कंबरदुखी ही अगदी कॉमन आणि नॉर्मल वाटणारी दुखणी. कामाच्या ताणने किंवा अशक्‍तपणानेही पाठदुखी व कंबरदुखी सुरू होते. या दुखण्याकडे बरेचवेळा दुर्लक्षही केले जाते, पण जर का अशी पाठदुखी किंवा कंबरदुखी वरचेवर होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. ही दुखणी मागे का लागतात तर…

कारणे ः आपली पाठ चोवीस तास कार्यरत असते. जेव्हा आपण उभे राहतो, बसतो, चालतो, पळतो आणि झोपतो तेव्हाही आपली पाठ काम करत असते. वजन नीट न उचलणे, नीट न बसणे, अनैसर्गिक चालणे, वेडेवाकडे झोपणे, तक्‍क्‍या, कद्दे वापरणे यामुळे कालांतराने पाठीची झीज होत राहते आणि स्नायूंना ताण येत राहतो त्यामुळे पुन्हा पाठीच्या स्नायूंना ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी होत जातो व पाठदुखी व कंबरदुखी सुरू होते. जेव्हा सुरुवातीलाच पाठदुखीकडे लक्ष दिले तर थोड्याशा नियमित व्यायामाने कधीही पाठ, कंबर दुखत नाही. पाठीच्या मणक्‍याचीही कधीच झीज होत नाही. आपल्या पाठीशी मान, मधील पाठ, कंबर यांचा जवळचा संबंध असतो तसेच पाठीला पोटाच्या स्नायूंचा भक्‍कम आधार असतो. निरोगी पाठ ही पाठीच्या सपोर्ट सिस्टीमवर अवलंबून असते शिवाय पाठीशी संबंधित काय काय असते ते आपण पाहुयात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाठीची रचना ः 
1. मणके ः- पाठीचे मणके पाठीला आकार व आधार देतात तसेच त्यांच्यामधील पोकळीतून मेंदू मज्जारज्जूरूपी खालील भागाला संवेदना व चेतना पुरवितो. या मज्जारज्जूचेही रक्षण मणके करतात.
2. डिस्क ः डिस्क ही उशीसारखी असते. दर दोन मणक्‍यांमध्ये डिस्क असते. डिस्क ही “फायब्रस’ आणि “टेफ’ असते. या डिस्कच्या बाहेरील बाजूस वेदना वाहून नेणारे चेतातंतू असतात. डिस्कच्या आतील न्यूक्‍लियस या सॉफ्ट भागाचे रक्षण होते.
3. सांधे – मणक्‍यांमधील सांधे पाठीच्या हालचालीस मदत व सपोर्ट करतात.
4. स्नायू – पाठीचे स्नायू पाठीच्या कण्याला जबरदस्त आधार देतात व हालचालीस मदत करतात.

पाठीचा कणा हा लहान लहान मणक्‍यांनी बनलेला असतो आपले मणके एकावर एक माळेसारखे सांधून बसवलेले असतात व त्यांचा व्हर्टेब्रल कॉलम म्हणजेच पाठीचा कणा तयार होतो. पाठीचे मणके नैसर्गिकरीत्या शरीराचे वजन पेलून पायांकडे सोपवत असतात. मज्जारज्जू हा मेंदूचा दोरीसारखा भाग मणक्‍यांच्या आतील पोकळीमधून खाली येतो व इतर शरीराला चेतना पुरवतो.

पाठीचे कार्य 
पाठ शरीराच्या हालचालीस मदत करते.
पाठ सर्वात महत्त्वाचे म्हणजे मज्जारज्जूचे रक्षण करते.
शरीरास ताठपणा देते.

पाठीचा खालचा भाग शरीराचे वजन पेलण्यास मदत करतो. जेव्हा आपण वजन उचलतो, बसतो अथवा झोपतो त्यावेळीही आपली पाठ कार्यतत्पर असते त्यामुळे पाठीला कधीही विश्रांती मिळत नाही म्हणूनच कंबरदुखी व पाठदुखीचा त्रास अनेकांना होतो. त्याकडे वेळीच लक्ष देऊन उपचार करावेत हेच खरे!

पाठ ही सर्व शरीरभर पसरवणाऱ्या मज्जातंतूचे जाळे गुंफणाऱ्या मज्जारज्जूचे संरक्षण करते म्हणून पाठीच्या कण्याला नियमित व्यायम व्हावा यासाठी अर्ध मत्स्येद्रासन योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित करावे तसेच पश्‍चिमोत्तानासनही रोज करावे. यामुळे पाठीच्या कण्याला व्यायाम मिळतो. पाठदुखी अंगावर काढू नये. तसेच मधूनमधून शवासन करून पाठीला पूर्ण विश्रांती द्यावी. पाठीचे कार्य कुशल व्हावे व पाठीची क्षमता वाढावी म्हणून करावयाची आसने अशी.

सिद्धतेलाचा मसाज 

वातविकारावरील उपचारात तेल ह्या उत्कृष्ट वातघ्न द्रव्याचा वापर होतो. स्नेहन द्रव्यात तिळाचे तेल सर्वात श्रेष्ठ समजले जाते कारण तीळ तेल शरीरात लवकर मुरते शिवाय त्या तेलाने मसाज केला तर ते शरीरातील सांध्यापर्यंत पाहोचते. स्नेहरूमा नावाच्या मसाज ऑईलमध्येही तेलाच्या याच गुणधर्माचा विचार करण्यात आला आहे.

स्नेहरूमा तेलसिद्धीसाठी रास्ना, दशमुळा, निर्गुंडी यासारख्या प्रभावी वातनाशक द्रव्यांचा तसेच गंधपुरा ऑईल, टर्पेटाइन यांच्या वेदनाप्रशमन गुणधर्माचा वापर केला गेला आहे. या तेलाने वेदनादायक साध्यांवर योग्य प्रमाणात मसाज केल्यास तेथे स्निगधता उत्पन्न होते. यानंतर साध्यांना चिकटून असणारे दोष हळूहळू मोकळे होतात.

हे मोकळे झालेले दोष स्वेदनाद्वारे किंवा शेकाद्वारे बाहेर काढून टाकता येतात. यालाच स्वेदन चिकित्सा असे म्हणतात.
या चिकित्सेचा मन्याशूल, कटिशूल आणि गुडघेदुखीसाठी वापर केला जातो. स्नेहरूमासारख्या तेलाचा मसाज केल्यानंतर अवघडलेले सांधे हळूहळू मोकळे होतात.

या तेलातील इतर घटकांमुळे वेदना कमी होतात. यातील दशमुळा आणि तिळाचे तेल बलवर्धनाचे कार्य करत असल्यामुळे दुखणे बरे झाल्यानंतरही नित्य मसाज करत राहिल्यास मान जखडणे, दुखणे, हाताला मुंग्या येणे यासारखी लक्षणे हळूहळू कमी होऊन नष्ट होतात. या तेलाच्या नियमित मसाजाने खांद्यातील सांध्यांचे दुखणे कमी होऊन हाताची हालचाल सहजगत्या करता येते.

एवढेच नव्हे तर कंबरदुखी व सायटिकासारख्या विकारावरही या ऑईलचा वापर करता येतो. या तेलाच्या वापराने कंबरेच्या वेदना कमी होतात. तेलाच्या नियमित मसाजाने कंबर, गुडघे आणि पोटऱ्यांमधील स्थानिक वेदनांचे शमन होते.
औषधोपचार, तेलाचा मसाज, गरजेनुसार अन्न आणि पुरेशी विश्रांती या चतुसुत्रीद्वारे काही आठवड्यात रुग्ण बरा होतो. त्याला उठणे, बसणे तसेच वजन उचलण्यासारख्या क्रिया करत असताना वेदना जाणवत नाहीत. सर्वदेहिक वातविकारासाठी देखील मसाजाची ही उपचार पद्धती वापरली जाते.

या उपचार पद्धतीमुळे विकृत झालेल्या स्नायूंचा रक्‍तपुरवठा वाढतो आणि स्नायूंना येणारे काठीण्य टाळता येते.
एकंदरीत, बदलत्या जीवनशैलीत उद्‌भवणाऱ्या संधिवातासारख्या आजाराला किंवा किरकोळ अंग दुखणे, पाठ, कंबर दुखण्यालाही सिद्धतेलाच्या मसाजाने नियंत्रणात ठेवता येते. अर्थात मसाज करताना मात्र मसाज करणारी व्यक्‍ती तज्ज्ञ असली पाहिजे याची खबरदारी घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)