महात्मा गांधींचा केवळ चश्‍मा नको त्यांचा विचार कृतीत आणा

ज्येष्ठ विचारवंत प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन
सातारा – महात्मा गांधींना मारून, मारणारांचे प्रश्‍न मिटलेले नाहीत. हे गांधींना न मानणाऱ्यांना कळलंय म्हणून ते महात्मा गांधी यांचा चश्‍मा प्रतीक म्हणून वापरू लागलेत. लोगो पुरता चश्‍मा वापरून गांधी विचार समजणार नाही तर त्यासाठी गांधींचा दृष्टिकोन लक्षात घेऊन त्यांचा विचार आचरणात आणणे जरुरीचे आहे असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत प्रसाद कुलकर्णी (इचलकरंजी) यांनी सातारा येथे बोलताना केले.

सातारा शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त वर्षभर दरमहा गांधी विचाराचा जागर या व्याख्यानमालेअंतर्गत नगरवाचनालय, सातारचे पाठक हॉलमध्ये प्रसाद कुलकर्णी यांचे महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य चळवळ याविषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी कुलकर्णी यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी विचारमंचावर सातारा शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भारती – झुटिंग, सुभाष जाजू उपस्थित होते.
महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठीच जिवन वेचले. महात्मा गांधी यांची चळवळ, आंदोलन याकडे मानव मुक्तीचे आंदोलन या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. सर्वसामान्य माणसाचे दु:ख गांधींना नष्ट करायचे होते आणि हे हिंदुत्ववाद्यांना, वर्णवर्चस्ववाद्यांना नको होते असेही प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे महात्मा गांधी यांच्याकडे आल्यानंतर त्याचे दरबारी स्वरूप गेले आणि त्यास मैदानी राजकारणाचे स्वरूप आले, असे सांगून प्रसाद कुलकर्णी म्हणाले की महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेकांचे शत्रू होते, हे ठासून सांगण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. मात्र हे दोघेही एकमेकांना पूरक काम करत होते. सध्याच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून खेड्यांचे उद्‌ध्वतीकरण चाललेय अन्‌ स्मार्ट सिटीचा डंका पिटला जातोय. अर्थात ती सुद्धा स्मार्ट झाली नाहीत, असेही प्रसाद कुलकर्णी म्हणाले. यावेळी सुभाष जाजू यांच्या हस्ते प्रसाद कुलकर्णी यांचे स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविक डॉ. रवींद्र भारती-झुटिंग यांनी केले. आभार सादिक खान यांनी मानले. यावेळी डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, कॉ. अंजलीताई महाबळेश्‍वरकर, विजय मांडके, मिनज सय्यद, अन्वर पाशा खान, डॉ. अजय साठे, जयंत उथळे, अनिल मोहिते, आरिफ बागवान, प्रा. युवराज जाधव, महेश गुरव, प्रकाश खटावकर, कॉ वसंतराव नलावडे, मदन देशपांडे, निलेश पवार, शुभम तंटक आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)