काँग्रेसचा प्रपंच रस्त्यावर आणला, हे विसरू नका

अशोक गायकवाड यांचा भाजपला इशारा : साताऱ्याची जागा देणार नाही

सातारा – जिकडे रामदास आठवले, तिकडे सत्ता हे समीकरण ठरलेले आहे. ज्या कॉंग्रेसने आठवलेंची भांडी रस्त्यावर आणली त्या कॉंग्रेसचा संपूर्ण प्रपंचच रस्त्यावर आणण्याचे काम आम्ही केले. हे करत असताना भाजपचा प्रपंच बसविण्याचे काम आम्ही केले. ह्या उपकारांची जाणीव नसेल तर ती करून देवू आणि साताऱ्याची जागा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमची ही जागा दाखवून देवू, असा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित एल्गार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी ज्येष्ठ नेते अण्णा वायदंडे, शरद गायकवाड, शुक्राचार्य भिसे, अप्पा तुपे, विजय येवले यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते. पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, मागील निवडणुकीत साताऱ्याची जागा रिपाइंला कायमची म्हणून सोडण्यात आली. त्या निवडणुकीत उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतली अन निवडणूक लढविण्याचे शिवधनुष्य मी पेलले. पक्षासाठी बलिदान दिले. मात्र, त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराने बंडखोरी केली तर भाजपने अलिप्त भूमिका घेतली. अशा सर्व परिस्थितीत निवडणूक लढविली. शिवसेना व भाजपने मनापासून मदत केली असती तर क्रमांक दोनची मते मिळाली असती. मात्र, ताटात वाढून हिसकावून घेण्याचे काम त्यावेळी करण्यात आले. आता ना.रामदास आठवले दोन जागा मागत आहेत. त्या जागा मिळाल्या नाही तर योग्य निर्णय घेतला जाईल. आमच्या ताटातील ह्यावेळी कोणालाही हिसकावून घेवू देणार नाही.

मागील निवडणूकीनंतर रिपाइंला सन्मानाचे स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, जिल्हा नियोजन समिती तसेच इतर समित्यांमध्ये एका ही कार्यकर्त्याला संधी देण्यात आली नाही. तरी देखील आम्ही एका शब्दाने तक्रार केली नाही हे नशिब समजा. मात्र, आता लोकसभेची जागा हिसकावून घेणार असाल तर जागा दाखवून द्यावी लागेल. सन्मानाने आम्हाला जागा सोडावी. आम्ही त्या जागेवर सक्षम उमेदवार देवू. मात्र, पुन्हा एकदा आमच्या हातात मडके देण्याचा विचार करणार असाल तर तुमच्या हातात कटोरा देण्यात येईल, असा इशारा गायकवाड यांनी दिला. मागील निवडणुकीच्या अगोदर भाजपचे किती खासदार अन आमदार होते, याचे आत्मपरिक्षण करा.

आम्ही संख्येने कमी असलो तरी आमच्या मतांच्या जोरावर तुमचे खासदार, आमदार निवडून आले आहेत. याचे भान ठेवा. देशाला विकासाची गरज आहे. मात्र हा विकास होत असताना आम्ही केवळ भीक मागायची का, असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित करून म्हणाले, आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत, आमच्या ताटातील हिसकावून घेणार असाल तर तुम्हाला सुट्टी देणार नाही. आम्हाला दुय्यम वागणूक देणार असाल तर तुमचे सरकार ही परत येणार नाही, असे गायकवाड यांनी सांगितले.

तसेच साताऱ्यातील भीमाई स्मारकाला निधी आला परंतु एक जणाच्या आडमुठेपणामुळे काम प्रलंबित ठेवण्यात आले आहे. आम्ही स्वत:ला भीमाईची लेकरं म्हणवून घेतो मात्र आपल्या मातेचे स्मारक प्रलंबित राहणे योग्य नाही. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ काम सुरू करावे, यासाठी पाठपुरावा करायचा आहे. तसेच वतनाच्या जमिनी इतरांनी बळकाल्या आहेत. त्या बाबतच्या तक्रारी तालुकाध्यक्षांकडे द्या. एका महिन्यात त्या जमिनी तुमच्या ताब्यात देवू, असे आश्‍वासन देवून गायकवाड म्हणाले, येत्या महिन्यापासून महिन्याच्या प्रत्येक एक तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनता दरबार भरविण्यात येणार आहे. त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी जनतेच्या तक्रारी घेवून याव्यात. त्या तक्रारींचे निरसन तात्काळ केले जाईल,
असे ही गायकवाड यांनी सांगितले. यावेळी बहुतांश पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीत अशोक गायकवाड यांच्या पाठीशी उभा राहण्याचे आवाहन केले.

भारत बंद रिपाइंनेच केला

वंचित बहुजन आघाडीचा आम्ही सन्मान करतो. मात्र, निर्णय योग्य घेणार नसाल तर संशय निर्माण होण्यास वाव आहे. तसेच भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर पुकारण्यात आलेला भारत बंद हा रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी यशस्वी केला. त्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमचा श्‍वास आहे. आणि श्‍वास घेताना कोणी हात ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना सडेतोड उत्तर देण्यात येईल, या उदिष्टाने रिपाइंने भारत बंद करून दाखवला, असे स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले.

कार्यकर्त्यांचे फेसबुक लाईव्ह
दरम्यान, अशोक गायकवाड यांनी भाषणाची सुरूवात करतानाच उपस्थित कार्यकर्त्यांना मोबाईलव्दारे फेसबुक लाईव्ह करण्यास सांगितले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी फेसबुक लाईव्हव्दारे अर्धा तासापेक्षा अधिकचे प्रेक्षपण यावेळी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)