स्वत:ची अपूर्ण स्वप्ने मुलांवर लादू नका : पंतप्रधान

“परीक्षा पे चर्चा’ मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी पंतप्रधानांचा संवाद

नवी दिल्ली : आपली अपुरी राहिलेली स्वप्न मुलांनी पूर्ण करावीत, अशी अपेक्षा पालकांनी लादू नये. प्रत्येक मुलाची आपापली क्षमता आणि गुणवत्ता असते ती समजून घेत त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मात्र, त्याचवेळी अपेक्षा किंवा महत्त्वाकांक्षा असणे गैर नाही, असेही ते म्हणाले. निराशा आणि दु:खाच्या वातावरणात कोणीही जगू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. नवी दिल्लीत तालकटोरा मैदानावर आज आयोजित करण्यात आलेल्या “परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला.

शिक्षण व्यवस्थेत बदल घडवण्याची गरज…
“परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांना सांगितले. परीक्षा केवळ पास होण्यासाठी नसाव्यात तर विद्यार्थी खरोखर काय शिकले हे जाणून घेण्यासाठी असाव्यात. शिक्षणाचा उपयोग आयुष्यातील आव्हाने पेलण्यासाठी करता यायला हवा, असे पंतप्रधान म्हणाले. विद्यार्थ्यांनी निराशेच्या गर्तेत जाऊ नये असे सांगत आपल्या निराशेविषयी तसेच मानसिक अस्वस्थतेविषयी मुलांनी मोकळेपणाने संवाद साधावा. पालकांनीही मुलांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जवळजवळ दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात परीक्षेतील ताणतणाव दूर करण्यासाठी हलकाफुलका संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात यंदा परदेशातले विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते. मुलांकडून अवास्तव अपेक्षा बाळगून त्याचे ओझे मुलांवर टाकणाऱ्या आणि स्वत:ही तणावग्रस्त असणाऱ्या पालकांना काय सल्ला द्यावा, अशा प्रश्नावर उत्तर देताना परीक्षेचा काहीही परिणाम होणार नाही, असे शक्‍य नाही. मात्र, संपूर्ण आयुष्यात त्याचे किती महत्त्व आहे हे समजून घ्यायला हवे. परीक्षा म्हणजे आयुष्य नव्हे, आयुष्यातला केवळ एक भाग असतो, हे समजले तर तणाव आपोआप कमी होईल. अपेक्षा हे ध्येय बनू देऊ नका, असे उत्तर पंतप्रधानांनी दिले.

ऑनलाईन गेम्सच्या वाढणाऱ्या आकर्षणाबाबत पंतप्रधान म्हणाले की, तंत्रज्ञान स्वत: चांगले किंवा वाईट नसते, त्याचा आपण कसा वापर करावा हे मुलांना शिकवायला हवे. त्यांना तंत्रज्ञानापासून दूर न करता त्याचा योग्य वापर शिकवणे हे पालकांचे काम आहे. मात्र, प्ले स्टेशनवर खेळताना, खेळांच्या मैदानांचा विसर पडू देऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला. वेळेच्या नियोजनाबाबत मोदींनी स्वतःचे उदाहरण दिले. सगळा देश माझे कुटुंब आहे, अशा भावनेतून मी काम करतो आणि कुटुंबासाठी झटताना तुम्हाला कधीही थकवा येत नाही. सकारात्मकतेने काम केल्यास त्यातून अधिकाधिक ऊर्जा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

करिअरसाठी विषयांची निवड करताना स्वतःच्या आवडीचा विचार करण्याचा आग्रह त्यांनी केला. आज प्रत्येक क्षेत्रात संधी आहे, त्यामुळे केवळ विज्ञान, गणित असे विषय निवडण्याची सक्ती करू नये. मुलांची स्पर्धा इतरांशी नाही तर स्वत:शी असावी, असा सल्ला त्यांनी दिला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)