शहरात अन्य ट्रॅफिक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी
खासदार बापट यांचा हेल्मेटसक्तीला अप्रत्यक्ष विरोध?
पुणे – महामार्गांवर दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांवर हेल्मेट सक्ती करावी. परंतु शहरात, मध्यवस्तीत दुचाकी चालवणाऱ्यांचे प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे सांगत खासदार गिरीश बापट यांनी हेल्मेटसक्तीला अप्रत्यक्षरित्या विरोधच केला आहे.
शहरात जे दुचाकी चालक मद्यप्राशन करून गाडी चालवतात, प्रमाणापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवतात, वाहतुकीचे नियम मोडून गाडी चालवतात, ट्रीपल सीट चालवतात अशांवर कारवाई होणे आवश्यक आहे. विनाहेल्मेट चालकांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे बापट म्हणाले.
शहरात विनाहेल्मेट चालकांवर मोठ्या जोमात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्याची धास्ती अनेकांनी घेतली आहे. परंतु त्याला काही संघटना, व्यक्ती, राजकीय कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. या आधी बापट यांनीही हेल्मेटसक्तीला विरोध केला होता. हेल्मेटसक्तीविरोधात आंदोलन, मोर्चेही काढण्यात आले आहेत.
मात्र, तरीही कारवाई सुरूच ठेवण्यात आली आहे. त्याविषयी बापट यांनी वरील प्रतिक्रिया दिली. हेल्मेट वापराबाबत दंड करण्यापेक्षा आधी जागृती होणे आवश्यक आहे. त्यातूनच स्वत:हून वाहनचालक हेल्मेट वापरासाठी उद्युक्त होतील. सक्ती केल्यास त्याला विरोधच होणार आहे. या विषयात पोलीस आयुक्तांच्या भेटीदरम्यान चर्चा करणार असल्याचे बापट यांनी सांगितले.