नदालसमोर जोकोविचचे कडवे आव्हान ; इस्नर-अँडरसन दुसरी उपान्त्य लढत

लंडन: अग्रमानांकित रॉजर फेडररला उपान्त्यपूर्व फेरीतच केविन अँडरसनकडून धक्‍कादायक पराभव पत्करावा लागल्यामुळे विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद खुले झाले आहे. आता उद्या (शुक्रवार) रंगणाऱ्या पुरुष एकेरीतील उपान्त्य फेरीच्या पहिल्या सामन्यात विश्‍वक्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या राफेल नदाल विरुद्ध पारंपरिक प्रतिस्पर्धी नोव्हाक जोकोविच अशी लढत रंगणार आहे. दुसऱ्या उपान्त्य सामन्यात केविन अँडरसनसमोर नवव्या मानांकित जॉन इस्नरचे आव्हान आहे.

तब्बल चार तास 48 मिनिटे रंगलेल्या ऐतिहासिक आणि प्रदीर्घ अशा उपान्त्यपूर्व सामन्यात द्वितीय मानांकित राफेल नदालने पाचव्या मानांकित युआन मार्टिन डेल पोट्रोचा कडवा प्रतिकार 7-5, 6-7, 4-6, 6-4, 6-4 असा संपुष्टात आणला. नदालने विम्बल्डन स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत स्थान मिळविण्याची ही सहावी वेळ आहे. तसेच त्याने ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत धडक मारण्याची ही 28वी वेळ आहे. नदाल-जोकोविच यांच्यातील लढतींमध्ये जोकोविचकडे 26 विजय व 25 पराभव अशी आघाडी आहे. जोकोविचने केई निशिकोरीचा चार सेटमध्ये पराभव करीत उपान्त्य फेरीत धडक मारली.
डेल पोट्रोविरुद्धच्या 16 लढतींमध्ये नदालने 11 व्यांदा विजयाची नोंद केली. नदालला आता 18वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावण्याची संधी असून हिरवळीच्या कोर्टचा सम्राट रॉजर फेडरर उपान्त्यपूर्व फेरीतच गारद झाल्यामुळे नदालच्या आशा उंचावल्या आहेत. नदालने विम्बल्डन स्पर्धेत 2008 आणि 2010 असे दोन वेळा विजेतेपद पटकावले असले, तरी त्यानंतर गेल्या सात वर्षांत त्याला विम्बल्डन विजेतेपदाने हुलकावणीच दिली आहे.

डेल पोट्रोने नदालविरुद्ध 33 बिनतोड सर्व्हिस आणि 77 विनर्स अशी कामगिरी करूनही त्याला पराभव पत्करावा लागला. नदालने डेल पोट्रोबद्दल सहानुभूती व्यक्‍त केली आणि अनेक अर्थाने तोही विजयासाठी तितकाच पात्र होता, असे सांगताना खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले. त्याचवेळी जोकोविच हादेखील अत्यंत अवघड प्रतिस्पर्धी असल्याचे सांगतानाच आपण उपान्त्य लढतीसाठी उत्सुक असल्याचेही नमूद केले.

दरम्यान, अखेरच्या उपान्त्यपूर्व लढतीत नवव्या मानांकित जॉन इस्नरने पहिला सेट गमावल्यानंतर झुंजार पुनरागमन करताना 13व्या मानांकित मिलोस रावनिचचा कडवा प्रतिकार मोडून काढत उपान्त्य फेरी गाठली. इस्नरने रावनिचवर दोन तास 42 मिनिटांच्या झुंजीनंतर 6-7, 7-6, 6-4, 6-3 अशी मात केली. इस्नरला उपान्त्य फेरीत फेडररला चकित करणाऱ्या आठव्या मानांकित केविन अँडरसनशी झुंज द्यावी लागणार आहे. अँडरसनने सव्वाचार तास रंगलेल्या लढतीत रॉजर फेडररवर 2-6, 6-7, 7-5, 6-4, 13-11 अशी खळबळजनक मात करीत उपान्त्य फेरी गाठली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)