दिवाळी झाली, पण पगारावर “संक्रांत’!

पीएमपी कामगारांना गेल्या महिन्याचा पगार अजूनही नाही

पुणे – ऐन दिवाळसणाच्या काळातच “पीएमपी’ कायमस्वरुपी कामगारांवर आर्थिक “संक्रात’ कोसळली आहे. या कामगारांना दिवाळीचा बोनस दिल्यानंतर त्यांना पगारच दिला नसल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबरची 17 तारीख उलटूनही प्रशासनाने यासंदर्भात अजून हालचाली केलेल्या नाहीत. पैसेच शिल्लक नसल्याचे कारण पुढे करत या कामगारांना पगार देण्यासाठी “तारीख पे तारीख’ दिली जात आहे.

-Ads-

पीएमपीच्या सुमारे पाच हजार कामगारांना प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आर्थिक फटका बसल्याने ते हवालदिल झाले आहेत. वाहक, चालक, वर्कशॉप, कार्यालयीन कामगार आणि अधिकारी असे साडेबारा हजार कामगार आहेत. त्यातील अधिकारी आणि कार्यालयीन कामगारांचा पगार हा दरमहा 1 तारखेला, तर कंत्राटी आणि रोजदांरीवरील कामगारांचा पगार 5 तारखेला होतो. तसेच कायमस्वरुपी कामगारांचा पगार महिन्याच्या 10 तारखेला होतो.

दिवाळीआधीच दोन्ही महापालिकांनी पीएमपीएमएल प्रशासनाला आर्थिक मदत केली होती. त्यातूनच या सर्व अधिकारी आणि कामगारांना बोनस मिळाला होता. त्यानंतर रोजंदारी आणि अधिकारी वर्गाचा पगार करण्यास प्रशासनाला यश आले होते. मात्र, ऐन दिवाळीत कायमस्वरुपी कामगारांना पगार देण्यास प्रशासनाला अपयश आले आहे.

या कामगारांनी आणि पीएमटी कामगार संघाने यासंदर्भात पीएमपीएमएलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालका नयना गुंडे यांच्याशी संपर्क साधून पगार मिळावा, असे साकडे घातले होते. त्यावेळी येत्या दोन दिवसांमध्ये पगाराच्या संदर्भात सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे आश्‍वासन गुंडे यांनी दिले होते. मात्र, तब्बल चार ते पाच दिवसांचा कालावधी उलटूनही यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. याला प्रशासनाचा वेळकाढूपणाच कारणीभूत आहे, असा आरोप पीएमटी कामगार संघाचे उपाध्यक्ष (इंटक) अशोकराव जगताप यांनी केला.

“त्या’ आश्‍वासनांचे काय झाले?
पीएमपी कामगारांचे पगार वेळेवर व्हावेत आणि स्पेअरपार्टसच्या अभावी बसेस बंद राहू नयेत, यासाठी पीएमपीचे तत्कालिन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी एक आराखडा तयार केला होता. त्यामुळे त्यांच्या अल्पशा कालावधीतही पीएमपीचा गाडा व्यवस्थित सुरू होता. मात्र, डॉ. परदेशी यांच्यानंतर आलेल्या सर्वच अध्यक्षांच्या कार्यकाळात या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणीच झाली नाही, असा आरोपही अशोकरा जगताप यांनी केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)