विविधा : गाडगे महाराज   

माधव विद्वांस

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला !! असे सांगत गावोगाव प्रबोधन करणारे आधुनिक संत गाडगेबाबा यांचे आज पुण्यस्मरण.अमरावती येथे जात असताना पेढीनदीचे काठावर वलगाव येथे त्यांचे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले.
त्यांना महाराष्ट्राचे संत परंपरेतील शेवटचे संत म्हणावे लागेल. गाडगे महाराजांचा जन्म त्यांच्या आजोळी अमरावती जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्‍यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. दिनांक 1 फेब्रुवारी, 1905 रोजी त्यांनी घरादाराचा त्याग केला. अंगावर फाटकी गोधडी आणि डोक्‍यावर फुटक्‍या मडक्‍याचे खापर व एक झाडू घेऊन ते फिरत असत. त्यामुळे त्यांना गोधडे महाराज किंवा गाडगे महाराज असे म्हणत.सामान्य लोक त्यांना गाडगेबाबा म्हणूनच ओळखत असत. लहानपणापासूनच ते सवंगड्या मध्ये प्रिय होते. मित्रांना ते गोष्टी सांगायचे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या गोष्टी सांगता सांगता ते सत्यही शोधू लागले. खेडेगावात चालणाऱ्या खर्चिक नवस, मृत्यूनंतर दिवसांसाठी होणारा खर्च घरातील लोकांना डोईजड होत असे त्यामुळे ते व्यथित होऊ लागले. ते अत्यंत सोप्या भाषेत त्यातील खोटेपणा लोकांना समजावीत त्यासाठी लोकांचे मनातील भावनेला धक्का न लावता गोपाळांचे नाव घेतच, बळी देऊन पाप कसे करतो हे समजावून सांगितले. त्यांनी कोणावरही भडक टीका न करता आपले विचार प्रभावीपणे मांडले. महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगाव कीर्तने करून लोकांचे प्रबोध केले.
बाबा कीर्तन करता करता श्रोत्याना प्रश्‍न विचारीत व ते करीत असलेल्या अंधश्रद्धेचे भांडे फोडीत असत. त्यांची ही प्रश्‍नमंजुषा खूप प्रभावी ठरली.

स्वच्छतेचे प्रतीक असलेला झाडू घेऊनच ते फिरत असत व जातील तेथे गावात प्रथम रस्ते झाडायला सुरवात करीत. स्वच्छता किती महत्वाची आहे हे लोकांना पटवून देत ते परिसर स्वच्छतेचा व मानसिक स्वच्छतेचे दूत बनले. आपल्या कीर्तनातून, उपदेशातून सहजपणे चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्‍यता पाळू नका असे ते सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी लोकांच्या मनावर मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.

घर सोडल्यावर विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी श्रमदान करून नदीवर घाटही बांधला व तेथे येणाऱ्या यात्रेतील अनाथ व अपंगांना जेवण मिळावे म्हणून अन्नछ्त्रही चालू केले,व गोवधबंदी करा असे सांगत बसण्यापेक्षा अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या. तसेच अनाथांसाठी व अपंगांसाठी समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांनाही त्यांनी देणग्या मिळवून दिल्या दिल्या. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)