पेशंटला वेटिंगवर ठेवले जात असल्याची तक्रार; जिल्हा शल्यचिकित्सकांकडून दखल
सातारा – सातारा जिल्हा रुग्णालयाचा डायलिसिस विभागाच्या कामकाजावर अनियमिततेची तक्रार नोंदवण्यात आली आहे. डायलिसिस चे पेशंट वेटिंगवर ठेवण्याचा गंभीर लेखी आरोप झाल्याने या प्रकरणाची दखल खुद्द जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अमोद गडी कर यांनी घेत डायलिसिस विभागाच्या वरिष्ठ तंत्रज्ञानांना समज दिली आहे. मात्र या विभागात नोंदणी प्रमाणेच रुग्णांचे डायलिसिस आवश्यक त्या तपासणीच्या अहवालानंतरच करण्यात येते असा स्पष्ट खुलासा डायलिसिस विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ विजयसिंह बर्गे यांनी करत झालेल्या तक्रारीचे खंडन केले आहे.
सातारा जिल्हा रुग्णालयात सुविधांची व औषध उपचारांची गुणवत्ता ही सरकार दरबारी दखलपात्र आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात सातारा जिल्हा रुग्णालयाचा सुविधांच्या बाबतीत सोळावा क्रमांक आहे . जिल्हा रुग्णालयाचे विविध विभाग अद्ययावतीकरणाच्या रांगेत आहेत. मात्र ज्या विभागाची यंत्रणा सर्वोत्कृष्ट आहे उपचार पध्दत संवेदनशील आहे त्याच डायलिसिस विभागात नवीन येणारे पेशंट वेटिंगवर ठेवल्याचा लेखी पण गंभीर आरोप केसरकर पेठेतील एका रुग्णाने केला आहे. ही तक्रार थेट जिल्हा शल्यचिकित्सकांच्या टेबलावर गेल्याने या प्रकरणाचा भलताच गाजावाजा झाला . बर्गे यांच्यावर पेशंटच्या प्राधान्यक्रमांची अनियमितता, तातडीच्या क्रमांकासाठी पैशाची मागणी करणे, रुग्णांना दिशाभूल करणारी माहिती देणे असे गंभीर आरोप झाल्याने या प्रकरणाने वादाचे वळणं घेतले आहे. त्यामुळे तक्रारदार व चिकित्सक तंत्रज्ञ यांच्यात काही वैयक्तिक वाद या प्रकरणाच्या मुळाशी आहेत का? हे तपासण्याची गरज आहे.
देशांच्या संरक्षणासाठी तब्बल चोवीस वर्ष सीमेवर तैनात राहिलेले एक्स सर्विसमन विजयसिंह बर्गे हे येथे वरिष्ठ तंत्रज्ञ आहेत. त्यांनी झालेल्या आरोपाबाबत तीव्र खेद व्यक्त करताना त्यांचे स्पष्ट खंडन केले. ते म्हणाले डायलिसिस विभागात संपूर्ण स्वच्छता पाळून दिवसाला बारा ते पंधरा पेशंटचे डायलिसिस केले जाते. नोंदणीकृत पेशंटलाच प्राधान्य देऊन त्यांच्या आवश्यक चाचण्यांचे अहवाल मागविले जातात. मी स्वतः लष्करी सेवेतील असल्याने फुकटचे आर्थिक लाभ मिळवण्याचा माझा स्वभावाच नाही. मला माझी लष्करी सेवेची पेन्शन व येथील वेतन पुरेसे आहेत. मी माझे स्पष्टीकरण माझ्या वरिष्ठांना दिले आहे. ज्यांनी तक्रार केली त्यांचा तक्रारी मागचा हेतू संशयित असू शकतो.
– विजय सिंह बर्गे वरिष्ठ तंत्रज्ञ डायलिसिस विभाग जिल्हा रुग्णालय सातारा