अत्याधुनिक उपचारांसह रुग्णसेवेसाठी तत्पर जिल्हा रुग्णालय

– संदीप राक्षे

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,’ या संताच्या उक्तिप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या शोषितांची सेवा हीच ईश्वर सेवा मानली होती. त्याच संत महंताच्या वचनाला ब्रीद मानणारे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी रुग्णसेवेला आपल्या आयुष्याचे संचित मानले आहे. जिल्हा रुग्णालयाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा दर्जा देण्यासाठी डॉ. गडीकर यांनी कंबर कसली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा रुग्णालयासह दोन उपजिल्हा रुग्णालये आणि तालुकानिहाय प्राथमिक आरोग्य केंद्र असे दीड हजार कर्मचाऱ्यांचे कुटुंब सांभाळणाऱ्या डॉ. अमोद गडीकर या कुटुंबप्रमुखांनी आपले कुटुंब स्वस्थ आणि आरोग्यदायी ठेवण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी ऑगस्ट 2018 पासून गेल्या दहा महिन्यांत त्यांनी वेगवेगळे प्रयोग करायला सुरवात केली आहे. या सर्जनशील डॉकटरांनी साताऱ्यात दाखल झाल्यापासून कामात सातत्य आणि चिकाटीने पाठपुरावा या गोष्टी कटाक्षाने पाळत शिस्तबध्द कारभाराची व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्‍टर जर सकाळी नऊ वाजता ओपीडीत हजर झाले तर रुग्णसेवेची घडी बसेल हा दंडक गडीकर यांनी स्वतः घालून देत आपणही सकाळी नऊ वाजता कार्यालयात हजर होण्याचे सुरू केले आहे. मूळचे मराठवाड्यातील निलंगा येथील डॉ. गडीकर यांनी एकवीस वर्षाच्या कारकिर्दीत साधारण पंचवीस हजार नेत्रशस्त्रक्रिया केल्या. औरंगाबाद मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय स्नातक असणारे डॉ. गडीकर यांची पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून सेवा सुरू होती. मात्र डॉ. श्रीकांत भोई यांच्या सेवानिवृत्तीनंतर डॉ. गडीकर यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून जवाबदारी चालत आली. या पदासाठी अनेक जणांचा राजकीय वळणाने प्रवास झाला पण कर्तृत्वाची आणि कामाच्या ध्यासाची उज्ज्वलता कमी पडल्याने ही जवाबदारी गडीकर यांच्याकडे येणे साहजिक होते.

अवघ्या आठ महिन्यांत तब्बल दोन डझन प्रकल्पांचे पूर्णत्व, आरोग्य उपसंचालक व जिल्हा आरोग्य यंत्रणांशी सतत संपर्क, जिल्हयाच्या रुग्णालय सेवेत असणारी मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी सततचा पाठपुरावा जिल्हा रुग्णालयाला स्वतःची जहागिरी समजणाऱ्यांना कठोर नियमांनी लावलेला चाप हीच गडीकरांच्या शांत पण अचूक कारभाराची वैशिष्टये आहेत.

प्रभात परिवाराशी संवाद साधताना डॉ. गडीकर पुढे म्हणाले रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीद अंगीकारून, व्यवसाय नव्हे तर एक मिशन म्हणून काम करणाऱ्या ध्येयनिष्ठ डॉक्‍टरांची संख्या आजही कमी नाही. जिल्हा रुग्णालयं व प्राथमिक आरोग्य केंद्र ही रूग्णसेवेची मंदिर असून आम्ही त्याचे प्रामाणिक विश्वस्त आहोत आणि ती जवाबदारी कामातून सिद्ध होते. त्यामुळे समाज आजही डॉक्‍टरांना देवच मानतो आजच्या काळात ही वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी डॉक्‍टरांनी जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया शिबिरांमध्ये लोकसहभाग वाढवत मानवतेचा धर्म पाळला जातो. म्हणूनच आरोग्य हीच आपली संपत्ती आरोग्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी ती घेणे गरजेचेच आहे. (पान 4 वर)

वूमन्स हॉस्पिटलची लवकरच पायाभरणी
साताऱ्यात सिव्हिल हॉस्पिटलचे नाव निघाले की तेथील पारदर्शक व्यवहार व दर्जेदार उपचारांची चर्चा व्हावी म्हणूनच रुग्णालयाच्या एकाच छताखाली साऱ्या सुविधा उपलब्ध असाव्यात, ही डॉ. गडीकर यांची धडपड आहे. उपलब्ध 242 कॉटसह स्वतंत्र शंभर बेडचे हॉस्पिटलची तांत्रिक प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. या हॉस्पिटलनंतर साताऱ्याच्या रुग्णसेवेत खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण दिसणार आहे. आरोग्य संचालनालयाकडे या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा पाठपुरावा सुरु आहे.

काय मिळाले जिल्हा रुग्णालयाला
जिल्हा रुग्णालयाने गेल्या आठ महिन्यांत अनेक सुविधांचे बाळसे पकडले आहे. कॅन्सरचे नुसते नाव उच्चारले तरी माणूस भीतीने गर्भगळीत होतो. अशा कॅन्सर पीडित पेशंटना उपचार देणारी केमोथेरपी सुविधा जिल्हा रुग्णालयात सुरू झाली आहे. सीटी स्कॅन मशिनची परवानगी अंतिम टप्प्यात असून रुग्णांना या सुविधेचा मोठा आधार झाला आहे. सीआरएम टीम भेट, स्वाईन फ्लू उपचार सेवा, अपंगांसाठी स्वावलंबन प्रणाली, सुसज्ज अद्ययावत दोन ऑपरेशन थिएटर, सीटी स्कॅन सुविधा, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, मिझल्स रुबेला लसीकरण मोहिम, मिशन लक्ष्य अंर्तगत तीन एलआर व ओटीचे नूतनीकरण, डायलिसिस यंत्रणेची उपलब्धता, आरबीएसके अंर्तगत अवघड ह्रदय व बहिरेपणाच्या शस्त्रक्रिया, ऑडीओमेट्री मशीन व बेरा मशीनची उपलब्धता, पेस्ट कंट्रोल, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा प्रत्येक मजल्यावर वॉटर कुलर युनिट, इत्यादी सुविधा जिल्हा रुग्णालयाला अवघ्या आठ महिन्यांत उपलब्ध झाल्या आहेत.

म्हणून तर सर सलामत तर पगडी पचास’ असं म्हटल जातं आपल्या आरोग्यात बिघाड झाला तर आरोग्य यंत्रणा आहेतच. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय आणि तेथे रुग्णांना मिळत असलेल्या लोकोपयोगी अशा योजना असल्याकारणाने आरोग्यं धनसंपदा’ असं म्हटलं जातं. मानवाच्या उत्पत्तीपासूनच मानव आरोग्याची त्याला जमेल तशी काळजी घेतो. पूर्वी आयुर्वेदाचा आधाराने आजारावर उपचार होत वैद्य जडीबुटी देऊन आजारी व्यक्तीला नीट करतो. काळ बदलला आज 21 व्या शतकात मानव वाटचाल करीत आहे. युगानुरुप आरोग्य सुविधेत आमूलाग्र बदल झाले विज्ञानाने प्रगती साधली. असाध्य आजारावर साध्य असे उपचार होऊ लागलेत. आरोग्य यंत्रणेने रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून येथील जनतेची निःस्वार्थपणे, योग्य व यथोचितरित्या सेवा करावी. आजाराने पीडित रुग्णाशी सौजन्यपूर्ण संवाद, दर्जेदार औषधोपचार आणि रुग्णाची देखभाल या त्रिसूत्रीसह अद्ययावत यंत्रणा उभी झाल्यास अत्यंत माफक दरात जिल्हा रुग्णालयात उपचार उपलब्ध होतात.

जिल्हा रुग्णालय हेच माझे कुटुंब
पीडित रुग्णांची वेदना समजावून घेत त्यांना पीडा मुकत करणे हे माझे प्रथम कर्तव्य मी गेल्या दोन दशकामध्ये कसोशीने पाळले आहे. जिल्हा रुग्णालयासह जिल्हयाच्या आरोग्य व्यवस्थेत दीड हजार कर्मचारी या कुटुंबात असून जिल्हा शल्यचिकित्सक या नात्याने मी त्यांचा पालक आहे. पालक म्हणून वावरताना माझे काही विभाग रुग्ण शय्येवर आहेत. कायाकल्प विभागाचे काम प्रगतीपथावर असले तरी राज्यात सुविधानिहाय साताऱ्याचे जिल्हा रुग्णालय सोळाव्या क्रमांकावर गेले आहे. गेल्या तीन वर्षाचा कामाचा बॅकलॉग लगेच आठ महिन्यांत भरून येणे अशक्‍य आहे. जिल्हा रुग्णालयाच्या परिवारात विविध विभागातील कर्मचाऱ्यां कामाची शिस्त ठरवून देणे, आधी समज आणि मग नियमांचा चाप हा माझ्या कुटुंबव्यवस्थेचा दंडक आहे. परिवारात व्यक्ती तितक्‍या प्रकृती आहेत, त्यांना शिस्त लावताना कारवाई करण्यापेक्षा काम करवून घेणे हे जास्त महत्वाचे आहे. हे करताना प्रशासकीय कामाची चौकट मोडणार नाही याची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. जिल्हा रुग्णालय कुटुंबाचे मानसिक व शारीरिक स्वास्थ निरामय राहिल याची काळजी मला सतत घ्यावी लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)