जि.प.अध्यक्ष निवासस्थान परिसरात होणार कॉम्प्लेक्‍स

सर्वसाधारण सभेत आराखड्याला मंजुरी : बांधकाम विभागासाठी सॉफ्टवेअर
सातारा – जिल्हा परिषद मालकीच्या जागेतून उत्पन्न सुरू होण्याचा मार्ग मोकळा होत आहे. त्या मार्गाची सुरुवात खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानापासून होणार आहे. निवासस्थान परिसरात तीन मजली व्यावसायिक इमारत उभारण्याच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या बांधकाम दक्षिण व उत्तर विभागातील काम पेपरलेस करण्याच्या दृष्टीने सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून आता अंदाजपत्रकाच्या मंजुरीपासून ते कंत्राटदाराला बिले जमा करण्याचे काम ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दोन्ही विषयांचे प्रोजेक्‍टरव्दारे सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणानंतर सदस्यांच्या शंका व प्रश्‍नांची उत्तरे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर दोन्ही विषयांना मंजुरी देण्यात आली. सातारा-कोरेगाव मार्गावरील विसावानाका परिसरातील 10 हजार 400 चौ.मी. क्षेत्रात जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवासस्थान आहे. त्यापैकी 415 चौ.मी.जागेत निवासस्थान आहे तर उर्वरित 9 हजार 985 चौ.मी.जागेचा परिसर रिकामा आहे.

परिसरात व्यावसायिक इमारत उभारण्यासाठी वास्तूविशारदाची नेमणूक दि. 14 ऑगस्ट 2018 रोजी करण्यात आली होती. वास्तूविशारदांनी तयार केलेल्या तीन मजली इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आले. आराखड्यानुसार दोन फेजमध्ये इमारत तयार होणार आहे. एका फेजमध्ये तीन मजल्यांवर प्रत्येकी 37 प्रमाणे 111 गाळे बांधण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या फेजमधील इमारतीमध्ये देखील तीन मजले असून त्यामध्ये प्रत्येकी 31 प्रमाणे 93 गाळे बांधण्यात येणार आहेत.

एकूण 204 गाळ्यांच्या बांधकामसाठी 24 कोटी 26 लाख 33 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. सर्व गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून प्रति चौरसफुटासाठी 2 हजार रूपये प्रमाणे अनामत रक्कम जमा करून घेण्यात येणार असून त्याची संख्या 15 कोटी 92 लाख 558 रूपये इतकी होत आहे. एकूण 79 हजार 627 चौरस फुट जागेचे भाडे शासकीय दरानुसार प्रति चौरस फुट 112 रूपये प्रमाणे प्रति महिना उत्पन्न मिळणार आहे. सद्यःस्थितीत संपूर्ण कामासाठी 24 कोटी 26 लाख 33 हजार रूपये खर्च होणार आहे. त्यासाठी जिल्हापरिषदेच्या अंदाजपत्रकात तूर्त 5 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 

सरपंच परिषदेला मिळणार हॉल
नुकत्याच स्थापित झालेल्या सरपंच परिषदेला जिल्हा परिषदेच्या मालकीचा हॉल देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. साताऱ्यातील पोवईनाका परिसरात सभापती निवासस्थान परिसरातील पार्किंगच्या जागेतील हॉल देण्यात येणार आहे. दरम्यान, हॉल देण्याची मागणी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केली होती. त्याचा धागा पकडून मानसिंगराव जगदाळे यांनी सदस्यांसाठी देखील निवासस्थान उभारण्यात यावे, अशी मागणी करत टोला लगावला.

गुदगे-मानकुमरे यांचा कलगीतुरा
दरम्यान, सुरेंद्र गुदगे यांनी इमारतीच्या प्रशासकीय मंजुरीस हरकत घेतली. ते म्हणाले, इमारतीच्या आराखड्यानुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. अद्याप, फायर ब्रिगेड, टाऊन प्लॅनिंग व नगरपालिकेकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाच्या रकमेचे प्रमाण कमी-जास्त होवू शकते. त्यामुळे तूर्त अंदाजपत्रकाऐवजी आराखड्याला सदस्यांकडून मंजुरी घेण्यात यावी. गुदगे यांनी केलेली मागणी संजीवराजे ना. निंबाळकर यांनी मंजूर केली. मात्र, आराखड्याचे सादरीकरण होत असताना गुदगे यांनी आक्षेप घेतले. त्यावर उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी गुदगेंवर थेट निशाना साधला. ते म्हणाले, गुदगे साहेब, इमारत होवूच नये, अशी आपली इच्छा आहे का? जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथम उत्पन्नाच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. अशावेळी आपण सहकार्य करणे अपेक्षित आहे. आम्ही विद्यमान पदाधिकाऱ्यांचे तीन महिने बाकी आहेत. भविष्यात तुम्ही पदाधिकारी झालात तर कामाचे संपूर्ण श्रेय तुम्हीच घ्या, असे मानकुमरे यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)