डायग्नोस्टिक सेंटरसह डॉक्‍टरला ग्राहक मंचाचा दणका 

-चुकीचा सोनोग्राफी अहवाल
-डॉक्‍टरांनीही केले चुकीचे निदान 
-तरुणीला गरज नसताना करावी लागली लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया 

पुणे – चुकीचा सोनोग्राफी अहवाल देणाऱ्या डायग्नोस्टिक सेंटर, त्यावरून चुकीचे निदान करून लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडणाऱ्या डॉक्‍टरला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दणका दिला आहे.

शस्त्रक्रिया आणि रोगनिदानासाठी आलेला खर्च 20 हजार 60 रुपये, 21 मार्च 2018 पासून 12 टक्के वार्षिक व्याजाने दोघांनी वैयक्‍तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांना द्यावा. याबरोबरच मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी 1 लाख रुपये नुकसानभरपाई, तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 5 हजार रुपये देण्यात यावेत, असे अध्यक्ष अनिल खडसे, सदस्य अनिल जवळेकर, सदस्य शुभांगी दुनाखे यांनी आदेशात नमुद केले आहे.

याबाबत मोशी येथे राहणाऱ्या तरुणीने फॅमिली केअर डायग्नोस्टिक सेंटर, चिंचवड आणि डॉ. श्रीपाद नंदुरकर (चिंचवड) यांच्याविरोधात 29 ऑगस्ट 2018 रोजी तक्रार दाखल केली होती. फॅमिली केअर हे रोगनिदान केंद्र आहे. तर, डॉक्‍टर हे मूत्ररोगतज्ज्ञ आहेत. तक्रारदारांना मूत्रनलिकेत आग होणे, वेळोवेळी आणि अचानक मूत्रविसर्जनासाठी जावे लागणे, पाठीत आणि ओटीपोटात वेदना आणि थकवा अशा तक्रारी जाणवत होत्या.

त्यामुळे त्या 22 जानेवारी 2018 रोजी डॉक्‍टरांना भेटल्या. डॉक्‍टरांनी औषधोपचार लिहून देत काही चाचण्या करण्यास सांगितल्या. त्यानुसार तक्रारदारांनी फॅमिली केअर येथे चाचण्या केल्या. याबाबतचा अहवाल डॉक्‍टरांना दाखविला. डॉक्‍टरांनी त्यांना लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यास सुचविले. त्याची त्यांनी मानसिक तयारी केली. त्या चिंचवड येथील भट क्‍लिनिकमध्ये 21 मार्च 2018 मध्ये गेल्या. सोनोग्राफी अहवालानुसार, तेथे तक्रारदारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये तक्रारदारांच्या लेफ्ट ओव्हरीजमध्ये कोणत्याही प्रकारचे “डर्माईड सिस्ट’ आढळून आले नाही. तसेच ती आकाराने सामान्य होती. राईट ओव्हरीदेखील दोन छोट्या फॉलिकल्ससह सामान्य होती. त्यामध्ये पुढे नमुद करण्यात आले, की “लॅप्रोस्कोपी करण्याचा निर्णय पूर्णपणे नकारात्मक आणि अनावश्‍यक होता.

शस्त्रक्रियेनंतर 22 मार्च रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणात तक्रारदारांनी ग्राहक मंचात धाव घेतली. शस्त्रक्रियेसाठी आलेला खर्च 16 हजार 900 रुपये, रोगनिदानासाठी केलेला खर्च 3 हजार 160 रुपये वार्षिक 24 टक्के व्याजाने मिळावा. नुकसानभपराई 1 लाख रुपये, प्रवास खर्चासाठी 8 हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 50 हजार रुपये मिळण्याची मागणी केली.

नोटीस बजावूनही डायग्नोस्टिक सेंटर आणि डॉक्‍टरच्या वतीने कोणीही मंचात हजर राहिले नाहीत. वय फारसे नसलेल्या तरुण वयातील मुलीला खोटे निदान करून एखादी शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडणे ही निश्‍चितच सेवेतील त्रुटी आणि अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब असल्याचा निष्कर्ष काढत मंचाने वरील आदेश दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)