पुणे – हार्मोनी क्लबच्या रिया टावरी आणि केपी क्लबच्या डॉली पाटील यांनी पुणे जिल्हा हौशी ऍक्वेटिक संघटनेच्या वतीने आयोजित कै.रमेश दामले स्मृती जिल्हा अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत प्रत्येकी दोन सुवर्णपदके पटकावली.
टिळक जलतरण तलावावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रिया टावरीने 17 वर्षांखालील मुलींच्या गटाच्या 400 मीटर वैयक्तिक मीडले प्रकारात पहिले सुवर्णपदक पटकावले. तिने 6 मिनिटे 2.22 सेकंद वेळ नोंदवली. गौतमी अगरवालने (6 मि. 4.25 से.) रौप्य, तर जुई घमने (6 मि. 20.06 से.) ब्रॉंझपदक मिळवले. यानंतर रियाने खुल्या गटात 400 मीटर वैयक्तिक मीडले प्रकारातही सुवर्ण यश मिळवले. तिने 6 मिनिटे 2.22 सेकंद वेळ नोंदवली. गौतमी अगरवालने (6 मि. 4.25 से.) रौप्य, तर स्वरा शिंदेने (6 मि. 9.47 से.) ब्रॉंझपदक मिळवले.
यानंतर डॉली पाटीलने 14 वर्षांखालील मुलींच्या 400 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात 5 मिनिटे 3.45 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. दीक्षा यादवने (5 मि. 8.62 से.) रौप्य, तर सिया शेट्टीने (5 मि. 20.50 से.) ब्रॉंझपदक मिळवले. यानंतर डॉलीने दुसरे सुवर्णपदक वरिष्ठांच्या खुल्या गटात 400 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात मिळवले. तिने 5 मिनिटे 3.45 सेकंद वेळ नोंदवली. दीक्षा यादवने (5 मि. 8.62 से.) रौप्य, तर शाल्मली वाळुंजकरने (5 मि. 11.20 से.) ब्रॉंझपदक मिळवले.