जिल्हा बॅंकेची पीक कर्ज वसुली ठप्प

2 हजार 401 कोटींची थकबाकी : कर्जमाफीनंतर वसुलीचे प्रमाण घटले

नगर – सरसकट कर्जमाफीची अपेक्षा व दुष्काळामुळे कर्ज वसुलीला शासनाकडून देण्यात आलेली स्थगिती. यामुळे जिल्हा सहकारी बॅंकेची पीक कर्जाची वसुली पूर्णपणे ठप्प झाली आहे. 30 जुन 2019 पर्यंत 2 हजार 608 कोटी 74 लाख वसुली असतांना आतापर्यंत केवळ 206 कोटी 89 लाख रुपये वसुली झाली आहे. केवळ आठ रक्‍कक वसुली झाल्याने जिल्हा बॅंकेच्या अडचणी वाढल्या आहे. तब्बल 2 हजार 401 कोटी 85 लाख रुपये थकबाकीच्या वसुलीचे आव्हान जिल्हा बॅंकेसमोर उभे ठाकले आहे.

यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीपापाठोपाठ रब्बी हंगाम वाया गेला. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शासनाने जिल्ह्यातील 11 तालुक्‍यासह अकोले 5, कोपरगाव व श्रीरामपूर प्रत्येकी 1 अशा सात मंडळस्तरावर दुष्काळ जाहीर केला असून दुष्काळी सवलत योजना लागू करण्यात आली आहे. या योजनांमध्ये पीक कर्ज वसुलीला जुन महिन्यापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या वसुलीवर त्याचा परिणाम झाला आहे. अर्थात राज्य शासनाने 2017 मध्ये जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा कर्ज वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून वसुलीचे प्रमाण घटत चालले आहे. 30 जून 2016 पर्यंतच्या थकबाकीवरून कर्जमाफी योजना लागू केली होती. त्यानंतर शासनाने 2017 पर्यंतची थकबाकीची माहिती मागविल्याने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होण्याची अपेक्षा वाढली. त्यामुळे सन 2017 नंतर पीककर्ज वसुली पूर्णपणे ठप्प झाली आहे.

कर्जमाफी योजनेपूर्वी सन 2015 मध्ये 82 टक्‍के वसुली झाली होती. त्यानंतर सन 2016 मध्ये 81 टक्‍के वसुली झाली. मात्र कर्जमाफी योजना जाहीर झाल्यानंतर वसुलीचे प्रमाण दरवर्षी घटले. सन 2017 मध्ये 41 टक्‍के तर सन 2018 मध्ये 54.81 टक्‍के वसुली झाली आहे. सन 2018 मध्ये एकूण वसुलीसाठी 2 हजार 632 कोटी 67 लाख रुपये एवढी रक्‍कम निश्‍चित करण्यात आली होती. परंतू त्यापैकी 1 हजार 442 कोटी 93 लाख रुपये वसुली झाली आहे. यंदा तर वसुली पूर्णपणे ठप्प झाली आहे. केवळ 206 कोटी 89 लाख रुपये वसुली झाली आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या अडचणी वाढल्या आहे.

राज्यात बोटावर मोजता येतील एवढ्याच जिल्हा बॅंकांची आर्थिक सक्षम आहे. त्यात नगर जिल्हा बॅंकेचा समावेश आहे. आज बॅंकेकडे साडेसहा हजार रुपयांच्या ठेवी आहे. तर 4 हजार 76 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. त्यात पीक कर्जाचा समावेश आहे. खेळतेभांडवल देखील मोठे असल्याने जिल्हा बॅंकेला व्यवहार करणे शक्‍य होत आहे. परंतू आज 2 हजार 401 कोटी 85 लाख रुपये वसुली ठप्प झाली आहे. अर्थात सध्या साखर कारखाने सुरू असल्याने शेतकऱ्यांचा गाळपासाठी गेल्या ऊसाच्या बिलातून थेट विविध कार्यकारी सोसायट्यांना पीककर्जाची वसुली भरण्यात येत होती. परंतू वसुलीच्या स्थगितीमुळे हे चक्र बंद झाले आहे. त्यामुळे आता विविध कार्यकारी सोसायट्या देखील मोठ्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत.

कर्जमाफीचे गुऱ्हाळ अजून चालूच

सन 2017 पासून सुरू असलेल्या कर्जमाफीचे गुऱ्हाळ अद्याप संपले नाही. येत्या 31 मार्चपर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्टे शासनाने ठेवले आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून जिल्ह्यात 2 लाख 33 हजार 253 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. सुमोर 720 कोटी 46 लाख रुपये रक्‍कम वर्ग करण्यात आली आहे. आता केवळ एक रक्‍कम कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकरी वंचित आहे. दीड लाखांची माफी घेण्यासाठी उर्वरित कर्जांची रक्‍कम भरणे आवश्‍यक आहे. असे 15 हजार शेतकरी असून त्यापैकी 200 शेतकऱ्यांनी उर्वरित रक्‍कम भरल्याने आता त्यांना 2 कोटी 21 लाख 22 हजार रुपये वर्ग होणार आहे.

202 सोसायट्या अडचणीत

वसुली ठप्प झाल्याने जिल्ह्यात 202 विविध कार्यकारी सोसाट्या अडचणीत सापडल्या आहेत. जिल्हा बॅंकेकडून सोसायट्यांना व सोसायट्या सभासदांना कर्ज उपलब्ध करून देते. त्यातून काही टक्‍के व्याज सोसायट्यांना मिळत असते. परंतू गेल्या काही वर्षांपासून वसुली पूर्णपणे ठप्प झाल्याने सोसायट्यांचा तोटा वाटला आहे. सध्या तरी बॅंकेचे कर्ज व सभासदांना देण्यात आलेले कर्ज यात मोठी तफावत पडली आहे. सध्या 202 सोसाट्यांमध्ये 157 कोटी 61 लाख तफावत दिसून आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)