जिल्हा प्रशासनाचा विक्रमी मतदानाचा संकल्प

75 टक्‍के मतदानाचे उद्दिष्ट : मतदारांच्या प्रतिसादाकडे सर्वांचे लक्ष

पुणे – लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्‍केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. 2014 मध्ये निवडणुकीमध्ये जिल्ह्यात सुमारे 58 टक्‍के मतदान झाले होते. या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रशासनाने 75 टक्‍के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुणे व बारामती या दोन लोकसभा निवडणुकींमध्ये 41 लाख 87 हजार मतदार असून यातील किती मतदार या आवाहनाला प्रतिसाद देतात याबाबत सर्वांनाच उत्सूकता आहे.

पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्‍क बजावता येणार आहे. दरम्यान, सायंकाळी 6 वाजेपर्यंत रांगेत असलेल्या मतदारांना मतदान करता येणार आहे. यंदा लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रथात फेरी, पथनाट्य, महाविद्यालयांमध्ये जनजागृती, विविध कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मतदानाची माहिती तसेच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळेमधील विद्यार्थ्यांना संकल्प पत्र देण्यात आले. या पत्रामध्ये मी मतदान करणार अशा आशयाचा मजकूर होता. यावर पालकांची स्वाक्षरी घेऊन ते पत्र विद्यार्थ्यांनी शाळेत जमा केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

प्रवेशाळेळी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज
युवा मतदारांची मतदार यादीत नाव नोंदणी व्हावी, यासाठी महाविद्यालयांमध्ये सुद्धा शिबिरे घेण्यात आली. प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना मतदार नाव नोंदणीचे अर्ज देण्यात आले होते. हे अर्ज महाविद्यालयातच स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर शनिवारी, रविवारी सुद्धा मतदार नाव नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मोहिम राबविण्यात आली होती. या सर्व उपक्रमांना विद्यार्थांनी चांगला प्रतिसाद दिल्याने जिल्ह्यात मतदारांची संख्या वाढली आहे. तसेच, मागील सहा महिन्यांत जिल्ह्यात 3 लाख 92 हजार 729 नव मतदारांनी नोंदणी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)