विविधा: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 

माधव विद्वांस 

आज 17 नोव्हेंबर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्यस्मरण. त्यांचा जन्म पुणे येथे 23 जानेवारी 1926 रोजी झाला तर निधन मुंबई येथे 17 नोव्हेंबर 2012 रोजी झाले. पुरोगामी विचारांचे प्रबोधनकार ठाकरे हे त्यांचे वडील. वडिलांचा आक्रमकपणा त्यांच्यात पुरेपूर उतरला होता. वर्ष 1950 मध्ये व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी फ्री प्रेस जर्नलमध्ये काम सुरू केले. त्या बरोबरीने कंपन्यांसाठी जाहिरातीचे डिझाइन व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे अशी कामे करू लागले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

-Ads-

नावाप्रमाणे “मार्मिक’ असलेल्या स्वतःच्या साप्ताहिकातून त्यांचा कुंचला तलवारी प्रमाणे तळपू लागला. सनसनाटी वक्‍तव्य करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचे आचार्य अत्र्यांचे तंत्र वापरून त्यांनी आचार्य अत्रे यांनाही सोडले नाही. पोटात एक आणि ओठात एक असे त्यांच्या स्वभावात बिलकुल नव्हते. बाबरी मशीद पाडल्यावर तथाकथित रामभक्‍त राजकारण्यांनी दुःख व्यक्‍त केले होते. बाळासाहेब मात्र ठामपणे म्हणाले होते की, वादग्रस्त ढाचा उद्‌ध्वस्त करणारे शिवसैनिक असतील, तर माझ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे. त्यांचा स्पष्टवक्ते पणा बरेचदा अडचणींचा ठरला तरी त्याची सारवासारवी त्यांनी कधीही केली नाही.

कामगार चळवळीतील दहशतवादास त्यांनी त्याच भाषेत उत्तर देऊन शिवसेनेची मुबंईत पाळेमुळे घट्ट रोवली. शिवसेनेची 19 जून 1966 रोजी त्यांनी दिमाखात स्थापना केली. कम्युनिस्ट व इतर डाव्यांचे वर्चस्व संपविण्यासाठी सत्तारूढ कॉंग्रेस पक्षाने त्यांना अप्रत्यक्ष मदत केल्याचे बोलले जात होते. निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस, अत्रे, मेनन याना पराभूत करण्यासाठी त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. वर्ष 1966 ते 2012 या कालावधीत बाळासाहेब ठाकरे नावाचे वादळ महाराष्ट्रात घोंगावत होते. सत्तारूढ पक्षाला डाव्यांचे उच्चाटन झाले हा आनंद फार काळ राहिला नाही.

वर्ष 1971 मध्ये महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने मुंबईवर भगवा फडकविला व हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे पहिले महापौर झाले पाठोपाठ औरंगाबादवरही शिवसेनेने भगवा फडकावला. प्रमोद महाजन यांच्या प्रयत्नामुळे त्यांनी महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीचे पर्व सुरू केले व महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलून टाकली. झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल अशी महत्त्वपूर्ण कामे त्यांच्याच प्रेरणेतून झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)