नगर: महावितरणच्या हलगर्जीपणामुळे लालटाकी रस्त्यावरील पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका युवतीचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ सांगळे गल्ली येथील महावितणचे कार्यालयाची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली.
लालटाकी रोडवरील पोलीस मुख्यालयात वीजखांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून पूजा सुनील कुऱ्हे (वय-23) या युवतीचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. कुऱ्हे यांच्या घरासमोर वीजखांब आहे. या वीजखांबाच्या अर्थिंगचा जोड कुऱ्हे यांच्या घरासमोरील पायरीपर्यंत आहे. पूजा सकाळी या अर्थिंगच्या जवळ गेले असता तिला विद्युत प्रवाहाचा जोरदार झटका बसला. यात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना तिची मृत्यू झाला.
दोन दिवसापूर्वी शहराला वादळी पावसाने झोडपले होते. पोलीस मुख्यालयात मोठी हानी झाली होती. पोलीस मुख्यालयातील मोटार विभाग कार्यालयावरील आणि वसाहतीतील घरावरील पत्रे उडून गेले होते. काही घरांवर झाडे पडली होती. त्यातच वीज खांबही वाकडे झाले होते. तारा तुटल्या होत्या. या वादळी पावसात कुऱ्हे यांच्या घरासमोरील वीजखांबांच्या अर्थिंग जवळील जोड उघडा पडला होता. याबाबत कुऱ्हे यांनी महावितरण विभागाच्या कार्यालयाकडे दोन दिवसापूर्वी तक्रार केली होती. परंतु या विभागाकडून त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळेच पूजाचा बळी गेला असल्याने संतप्त नागरिकांनी महावितरण विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली.