वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्न गंभीर
रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य संकेतस्थळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. वैद्यकीय कचऱ्याची अशीच समस्या राहिल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन शकते. दोन वर्षांपासून देशपातळीवर स्वच्छता मोहिमेचा उपक्रम शासनाने सुरू केला आहे. यानिमित्ताने राजकीय नेते, समाजसेवी संस्था उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. परंतु, वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्न तसाच आहे. या मोहिमेंतर्गत वैद्यकीय कचराही उचलण्याची जबाबदारी घेतल्यास हा प्रश्न निकालात निघेल असेही नागरिकांनी म्हटले आहे
थेरगाव – वैद्यकीय कचऱ्याची (मेडिकल वेस्ट) विल्हेवाट योग्य प्रकारे लावणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत स्वतंत्रपणे हा कचरा उचलला जात असला तरी काही खासगी रुग्णालय या कचऱ्याची उघड्यावरच विल्हेवाट लावत असल्याचा प्रकार थेरगाव येथे समोर आला आहे. हा कचरा नागरिकांच्या आरोग्यावर बेतू शकतो. त्यामुळे या प्रकारांकडे गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात लहान-मोठे दवाखाने, रुग्णालये आहेत. रुग्णांसाठी वापरण्यात आलेली वैद्यकीय उपकरणे ठराविक दवाखान्यातून ती वैद्यकीय प्रकल्पाला देऊन आपला परिसर स्वच्छ ठेवला जातो; पण उपनगर भागात असणारे खासगी दवाखाने, रुग्णालये हा वैद्यकीय कचरा गावाजवळील रिकाम्या जागेवर अथवा ओढे, नाले यामध्ये टाकतात.
थेरगाव, गणेशनगर मधील लक्ष्मीबाई बारणे उद्यानाच्या मागे दवाखान्यात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप यासह अन्य वैद्यकीय कचरा उघड्यावरच टाकला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या उद्यानात लहान मुले खेळण्यासाठी येतात. त्यामुळे वैद्यकीय कचऱ्यातील साधनांचा खेळण्यासाठी वापर होऊन यातून अनेक अपायकारक घटना घडू शकतात. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब घातक आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित रुग्णालयावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरीक करीत आहेत.