निखळ करमणूक कि डोकेदुखी

पारावरची चर्चा : अमित डोंगरे

आज स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला घरी आल्यावर घटका दोन घटका निखळ करमणूक हवी असते. मात्र, सध्या दूरचित्रवाणी संचावर दाखवल्या जाणाऱ्या मालिका पाहिल्या की असे वाटते की, निखळ करमणूक मिळण्यापेक्षा डोकेदुखीच जास्त होते. तारक मेहता का उल्टा चश्‍मापासून तुपारे (तुला पाहते रे) पर्यंत यच्चयावत मालिका ही डोकेदुखी वाढवतात. या मालिका सायंकाळी अवघ्या स्त्री शक्तीचा ऱ्हास करतात, कर्तबगार स्त्रिया या मालिका पाहण्याच्या नादात घरकामासाठी कामवाली बाई ठेवतात आणि खुशाल टीव्ही समोर पाय पसरून बसतात. ही आवड इतकी पराकोटीची असते की घरातील फोन खणाणला किंवा एखादा पाहुणा घरी आला, तरी त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात.

मालिकांच्या वेळेत कोणी घरी येऊच नये अशी त्यांची धारणा असते. त्याचा नातेसंबंधांवर परिणाम होईल इतकी साधी गोष्टदेखील त्यांच्या लक्षात येत नाही. सध्या महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील प्रत्येक घरात हेच चित्र बघायला मिळते. पूर्वी दूरदर्शन हे एकमेव माध्यम होते, पण त्यावरील मालिकांचा दर्जा एका वेगळ्याच उंचीवर होता. बघा ना हमलोग, बुनियाद, नुक्‍कड अशा कितीतरी मालिका हव्याहव्याश्‍या वाटत होत्या. प्रत्येक आठवड्याला ठरावीक दिवशी या मालिका दाखवल्या जात होत्या, त्यामुळे त्यांची लोकप्रियता टिकून होती.

रामायण किंवा महाभारत या मालिकांच्या वेळी तर रस्ते रिकामे होत होते. आता केवळ भंपकपणा, टीआरपीची स्पर्धा यामुळे मालिकांचा दर्जा केव्हाच घसरला आहे आणि केवळ पाट्या टाकण्याचे काम सुरू आहे. एक अमिताभची “कौन बनेगा करोडपती’ ही मालिका वगळता अन्य कोणत्याच मालिकेने रस्ते रिकामे केले नाहीत. आज तर लागिर झालं जी पासून तुपारे पर्यंत प्रत्येक मालिकांचा बोजवारा उडालेला दिसतो.

लागिर मधील अज्याने पुन्हा सैन्यात जावे की नाही याचा काथ्याकूट गेले महिनाभर सुरू आहे, त्यात भर म्हणून भैय्यासाहेब त्यांच्या घरी राहायला आला आहे. त्याची कटकारस्थाने सुरूच आहेत. हा आधुनिक घरजावईच म्हणायचा का? दुसरीकडे तुझ्यात जीव रंगलामधील सरपंच पदाची निवडणूक जोरात सुरू आहे, या मालिकेचे शीर्षक पाहता हे सर्व काय सुरू आहे असा प्रश्‍न पडतो. अंजली आणि राणाची प्रेमकथा दाखवण्याऐवजी सरपंच निवडणूक आणि लाडूचे लाडच दाखवत बसले आहेत. हे सगळं पाणी घालण्याचेच प्रकार सुरू आहेत. या मालिकेत चला हवा येऊ द्याचे कलाकार आणखी काय धुमाकूळ घालणार आहेत समजत नाही. पूर्वी मालिकांचे कलाकार आपल्या प्रसिद्धीसाठी चला हवा येऊ द्या मध्ये यायचे आता चला हवा येऊ द्याचे कलाकार मालिकांमध्ये येत आहेत. म्हणजेच लोकप्रियता कोणाला हवी आहे असा प्रश्‍न पडतो. हा प्रकार म्हणजे चला हवा येऊ द्याला ओहोटी लागली की काय असा प्रश्‍न पडतो.

माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका तर शीर्षकापासूनच अपयशी ठरली आहे. केवळ महिला वर्गाला काय वाट्टेल ते दाखवण्याचे प्रकार सुरू आहेत. आता तर काय राधिका आणि शनाया यांच्यातील महासंग्रामाचा घाट घातला आहे. आपण काहीही दाखवू महिला वर्ग हे पाहणारच असा आत्मविश्‍वास दिग्दर्शक व निर्मात्यांना असतो. मुळात सवतीचा खेळ आजही आपल्या समाजात स्वीकारला जात नाही, त्यामुळे या मालिकेला योग्य वळण देऊन संपवलेले बरे. समाजातील घटनांचे प्रतिबिंब मालिका व चित्रपटात उमटते हे जरी खरे असले तरी सध्या सुरू असलेला तद्दन फालतूपणा पाहता ह्यांनी कुठली प्रतिबिंबं पाहिली आहेत असा प्रश्‍न पडतो.

तुपारे सुरुवातीला एक चांगली मालिका वाटत होती. मात्र, सुबोध भावेला खलनायकी पेहराव देऊन त्याचीही वाट लावणार की काय ही शंका मनात येते. पुनर्जन्म आणि जयदीपचा बिनडोकपणा या मालिकेची वाट लावणार असेच वाटते. सुबोध भावेने तर केवळ अर्थाजनापोटी ही मालिका स्वीकारली ही वस्तुस्थिती वाटते. इडियट बॉक्‍सवर आम्ही काहीही दाखवू, महिला वर्ग ते पाहतातच असा होरा दिग्दर्शक व निर्मात्यांचा असतो. त्यामुळे निखळ करमणुकी ऐवजी डोकेदुखीच बघायला मिळते. अतर्क्‍य गोष्टी दाखवून आम्ही समाजमनाचा वेध घेतो वगैरे सांगणे, म्हणजे अपयशातूनही यश शोधण्यासारखे आहे. शेवटी समाजाचे प्रतिबिंब मालिकात डोकावते की, मालिकांमुळे समाजस्वास्थ्य बिघडते हे ज्याचे त्याने ठरवावे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)